फायनान्स कंपनीच्या एजंटला लुटणारे चार चोरटे जेरबंद; मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 03:39 PM2023-02-09T15:39:39+5:302023-02-09T15:40:51+5:30
वेगवेगळ्या घटनेतील चोरट्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
नांदेड : मोटार सायकल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर फायनान्स कंपनीच्या दोन एजंट ना दिवसा ढवळ्या लुटून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना जेरबंद करत स्थानिक पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कामगिरी केली आहे. वेगवेगळ्या घटनेतील चोरट्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारत फायनान्स हैदराबाद या कंपनीचे फिल्ड ऑफिसर राम जाधव हे 25 जानेवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान फिल्डवरील महिला बचत गटातील सदस्यांच्या कर्ज हप्ते वसुलीची रक्कम घेऊन मुदखेडकडे निघाले असता मुदखेड भोकर रोड डोरली गेट लगत दोन मोटरसायकली अचानक समोर लावून खंजर व तलवारीचा धाक टाकून त्यांच्याकडील एक लाख तीस हजार इतकी रोख रक्कम जबरदस्तीने लुटून घेण्यात आली होती.
संबंधिताच्या फिर्यादीनुसार मुदखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरालगत असलेल्या न्याहाळी येथेही फायनान्स कंपनीच्या एजंटास खंजरचा धाक दाखवून रोख रक्कम व मोबाईल टॅब दिवसाढवळ्या लंपास करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आपल्या कल्पकतेतून या दोन्ही लुटमारीच्या घटना उजेडात आणण्यासाठी तपासास प्रारंभ केला.
या लुटमारीच्या घटनेमध्ये कोल्हा येथील मदन केशव बट्टेवाड, भास्कर केशव बट्टेवाड, आकाश दिगंबर वाघमारे रा. नांदेड, अजय राठोड, रा.वरदडा तांडा, या चार आरोपींना मुदखेड पोलिसांनी अटक करून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार मोटारसायकली व तीन मोबाईल असा एक लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही लुटमारीची घटना स्थानिक पोलिसांनी उजेडात आणल्यामुळे जिल्ह्यातील अन्य ठिकाणी झालेल्या लुटमारीच्या घटना उजेडात येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मोटरसायकल चोरट्यांचा तपास लावल्यानंतर दिवसाढवळ्या नागरिकांना लुटणाऱ्या लुटारूंच्या देखील पोलिसांनी आता मुसक्या आवळल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी करण्यात आली. या उल्लेखनीय कार्यवाही मध्ये पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस निरीक्षक राजू वटाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक काळे, पो .हे. का .कदम, पो .हे. का .विजय आलेवाड, चंद्रशेखर मुंडे, रवी लोहाळे, बलवीर सिंह ठाकुर, बालाजी गीते, विनायक मठपती, सायबर सेलचे राजू सिटीकर, दीपक ओढणे या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे हे करीत आहेत.