सोन्याच्या दागिन्यांसह चार ट्रक भरून मौल्यवान वस्तू पळविल्या, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 11:33 PM2023-03-02T23:33:20+5:302023-03-02T23:36:41+5:30
तालुक्यातील श्रीक्षेत्र उंबरझरा येथील श्री नृसिंह सरस्वती संस्थान प्रसिद्ध आहे.
घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील श्रीक्षेत्र उंबरझरा (इंझाळा) येथील श्री नृसिंह सरस्वती संस्थानच्या आश्रमामध्ये ८५ वर्षीय श्रीराम महाराज वास्तव्यास आहेत. त्यांच्या वयोवृद्धपणाचा, तसेच शारीरिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन संस्थानमध्ये तब्बल ४३ लाखांची अफरातफर केली. एवढेच नव्हे, तर १२० ग्रॅम सोन्यासह इतर मौल्यवान वस्तू चार ट्रकमध्ये भरून चोरून नेल्याचा प्रकार पुढे आला असून, याप्रकरणी नागपुरातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील श्रीक्षेत्र उंबरझरा येथील श्री नृसिंह सरस्वती संस्थान प्रसिद्ध आहे. या संस्थानचे ट्रस्टी म्हणून प्रमोद पुरुषोत्तम देशपांडे (६०), रा. चंडिकानगर, नागपूर, प्राची जं. प्रमोद देशपांडे (५६) माजी व्यवस्थापक व ट्रस्टी, रा. चंडिकानगर, नागपूर, अभय अरविंद चरडे (३८), माजी प्रभारी कोषाध्यक्ष व ट्रस्टी, रा. कारंजा घाडगे, ता.जि. वर्धा, ओमप्रकाश आनंदराव महाजन (३७) ट्रस्टी, रा. चंडिकानगर नागपूर, ओजस्वी आनंदराव महाजन (३४) ट्रस्टी, रा. चंडिकानगर, नागपूर, पूजा आनंदराव महाजन (३४) ट्रस्टी, रा. चंडिकानगर २, मानेवाडा बेसा रोड, नागपूर हे सहा जण काम पाहत होते, तर सुधीर अरविंद चरडे (३६), रा. चंडिकानगर हा ट्रस्टचा सेवक आहे.
वरील सात जण हे सन २०१२ पासून श्रीक्षेत्र उंबरझरा येथील ट्रस्टच्या दत्त मंदिर, हनुमान मंदिर व आश्रमशाळेशी जुळले, तसेच २०१२ पासूनच अभय चरडे, ओमप्रकाश महाजन, ओजस्वी महाजन आणि पूजा महाजन हे चौघे जण, तर २०१६ पासून प्रमोद देशपांडे, प्राची देशपांडे आणि सुधीर चरडे हे कायमस्वरूपी उंबरझरा येथील आश्रमात वास्तव्यास आले. १९ जून २०१८ मध्ये सदर ट्रस्टच्या रेकाॅर्डवर पहिल्या सहा जणांची ट्रस्टी म्हणून नोंद घेण्यात आली. यात ट्रस्टच्या दत्त मंदिर, हनुमान मंदिर व आश्रमामध्येच श्रीराम महाराज वास्तव्यास आहेत. त्यांचे वय आजमितीस ८५ वर्षे आहे.
श्रीराम महाराज यांच्यामार्फत वरील सात जणांपैकी पाच जण हे ट्रस्टचा कारभार पाहत होते. मात्र, या सर्व सात जणांनी मिळून महाराजांच्या वृद्धत्वाचा, तसेच त्यामुळे आलेल्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेत कट रचून महाराजांच्या खोट्या सह्या करून त्यांच्या घाटंजी येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या खात्यातून सुमारे ४३ लाख रुपयांचा घोळ केल्याची फिर्याद श्री नृसिंह सरस्वती संस्थान, उंबरझरा (इंझाळा)चे उपव्यवस्थापक श्रीधर बबीराम जाधव यांनी दिली. त्यावरून सात जणांविरुद्ध घाटंजी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्याच्या अंगठ्या, महाराजांच्या हस्तलिखित वाङ्मयासह इतर साहित्य लंपास
या सातही आरोपींनी विश्वासघात करीत महाराजांना भेट म्हणून दिलेल्या १२० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, महाराजांचे हस्तलिखित वाङ्मय, अनुग्रह दिलेल्या शिष्यांची नोंद केलेली डायरी, आध्यात्मिक पुस्तके, महत्त्वाचे साहित्य, सीसीटीव्हीचा डेटा, कॉम्प्युटरचा सीपीयू व इतर साहित्य चार ट्रकमध्ये भरून चोरून नेल्याचा आरोप आहे. घाटंजी ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार सुषमा बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास सिडाम हे करीत आहेत.