शाळा महाविद्यालयासमोर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारे चार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 08:03 PM2022-09-12T20:03:51+5:302022-09-12T20:04:26+5:30
या चार जणांकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सचिन राऊत, अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालय व मुंगीलाल बाजाेरीया विद्यालयासमोर देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करणारे तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या चार जणांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी ताब्यात घेतले़ या चार जणांकडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंगीलाल बाजाेरीया विद्यालयासमाेर तसेच रुग्णालयासमोर पानटपरीमधून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली.
या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून तंबाखूजन्य पदार्थ व दारूची विक्री करताना सतीश रमेश मिश्रा राहणार अनीकट, कृष्णा शांताराम करपे राहणार बार्शीटाकळी, सौरभ राजेंद्र वर्मा राहणार पोस्ट ऑफिस मागे व दिलीप शामराव अगडते राहणार रिधोरा या चार जणांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून रोख रकमेसह देशी व विदेशी दारूचा साठा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या चार जणांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कोटपा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली़