धक्कादायक! : नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार महिलांवर भोंदू मांत्रिकाचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 03:58 AM2021-01-18T03:58:00+5:302021-01-18T07:10:51+5:30
या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा.
नागपूर : भूतबाधेचा धाक दाखवून उपचाराच्या नावाखाली भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलगी, तिची आई, मामी आणि आजी अशा चाैघींवर सात महिन्यात अनेकदा बलात्कार केला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (५०) या मांत्रिकाला अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी हा निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधी-कधी अंगारे, धुपारे करायचा.
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या काळात (मे २०२०) पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडू लागली. त्यामुळे मांत्रिक निनावेने तिला आपल्या दरबारात आणायला सांगितले. त्याने अंगात आल्याचा बनाव करून मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगितले. त्यानंतर अंगारे-धुपारे, गुंगीचे औषध देऊन रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो ‘विधीच्या नावाखाली’ मुलीवर बलात्कार करू लागला. हे करतानाच त्याने एक दिवस मुलीच्या आईवरही बलात्कार केला. एक दिवस त्याने पूजेच्या नावाखालीच मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावरही बलात्कार केला. नंतर मुलीच्या ६० वर्षीय आजीसोबतही त्याने हे दुष्कृत्य केले.
अखेर पाप उजेडात आले -
- डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे हे कुकर्म सुरू होते. चाैघीही लज्जेखातर एकमेकींना हा प्रकार सांगत नव्हत्या. मात्र, एक दिवस तो बलात्कार करताना दुसरीला दिसला. ते बघून त्याने आपल्यासोबतही असेच केल्याचे पीडितेला सांगितले. नंतर मामी अन् आजीसोबत चर्चा झाली असता, त्याने आपल्यावरही अत्याचार केल्याचे सांगितले.
- गेल्या आठवड्यात पीडित परिवाराने पारडी पाेलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीला अटक करून आठ दिवस झाले तरीही पारडी पोलिसांनी या संतापजनक प्रकरणाचे वृत्त बाहेर कळणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.