मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:53 PM2020-02-21T23:53:34+5:302020-02-21T23:54:45+5:30
सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : सावनेर तालुक्यातील पटकाखेडी शिवारात मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. वर्षा मडावी (२६), रामप्यारी उदयसिंग ककोरीया (१८), अनसूया टेकाम (४५) आणि सुनिता कैलास (३५) सर्व रा.बरघाट, ता.शिवनी (मधप्रदेश) अशी मृत महिला कामागारांची नावे आहेत.
तालुक्यातील पटकाखेडी आणि अदासा सीमेतील नाल्यावर सिंचन विभागाच्या वतीने बंधाऱ्याचे काम सुरू आहे. या कामावर सकाळी १५ ते २० मजूर गेले होते. खड्ड्यात भिंत बनवित असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा तिथे उपस्थित महिला कामगारांच्या अंगावर कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तिघी गंभीर जखमी झाल्या.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लघु सिंचन विभागांतर्गत कंत्राटदार मंदीप चौधरी या बंधाऱ्याचे काम करीत आहे. या कामासाठी त्यांनी मध्य प्रदेशातून मजूर आणले आहेत. महाशिवरात्री असल्याने शुक्रवारी काम लवकर काम आटपून राहुटीकडे जाण्याचा कामगारांचा बेत होता. मात्र ही दुर्दैवी घटना घडली. इंदिरा धुर्वे, मधु आणि प्रियंका अशी जखमी महिला कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कंत्राटदारावर गुन्हा दाखल
ही घटना घटल्यानंतर कंत्राटदार चौधरी यांनी तीन मृत महिलांचे शवविच्छेदन होण्यापूर्वी त्यांचे मृतदेह परस्पर मध्य प्रदेशातील शिवनी येथे रवाना केले. यातील एक मृत महिला वर्षा मडावी हिचे सावनेर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी कंत्राटदार संदीप चौधरी रा.नागपूर आणि साईट इन्चार्ज जगदीश प्रसाद रा.अदासा यांच्यावर भादंविच्या कलम ३०४ (अ), ३३७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर कारंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.