सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
By दीपक शिंदे | Published: September 19, 2024 11:53 PM2024-09-19T23:53:54+5:302024-09-19T23:57:31+5:30
मुलावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, शिरवळ: खंडाळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाने घराच्या छतावर नेत चार वर्षीय मुलीवर अत्याचार केला. सूर्य दाखवतो, खाऊ देतो, पैसे देतो, असे सांगत अतिप्रसंग केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिस स्टेशनला अल्पवयीन मुलाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एका गावात चार वर्षे अकरा महिन्यांची मुलगी कुटुंबीयांसमवेत राहते. दरम्यान, संबंधित कुटुंबाच्या शेजारी तेरा वर्षे पाच महिन्यांचा अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी आला होता. यावेळी संबंधित चार वर्षीय मुलगी खेळत असताना मुलाने लहान मुलीला तुला सूर्य दाखवतो, खाऊ देतो, असे सांगत टेरेसवर नेले. यावेळी संबंधितांच्या मागे एक दुसरा अल्पवयीन मुलगा आला. त्याला संबंधित मुलाने पाच रुपये देत खाऊ आण, असे सांगितल्याने संबंधित मुलगा हा दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी गेला. यावेळी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने चार वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्यानंतर संबंधित मुलीला त्रास होऊ लागल्याने ती ओरडली. त्यावेळी अल्पवयीन मुलाने संबंधित मुलीला गाडीचे हूक लागले आहे, असे सांग मी तुला खाऊ देतो, असे सांगत घटनास्थळावरून पलायन केले.
यावेळी खेळून थकल्यानंतर मुलगी रात्री झोपी गेली असता रात्री दहाच्या दरम्यान संबंधित मुलीला त्रास होऊ लागला. हा अतिप्रसंगाचा प्रकार असल्याचे मुलीच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अतिप्रसंग केल्याप्रकरणी तेरा वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नयना कामठे करीत आहेत.