चार वर्षांपासून फरार सराईत गुन्हेगारास अटक, बलात्काराचा आरोपी देत होता हुलकावणी
By नरेश रहिले | Published: April 29, 2023 05:44 PM2023-04-29T17:44:02+5:302023-04-29T17:44:57+5:30
न्यायालयात हजर न होता हुलकावणी देणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट जारी केले होते. ४ वर्षांपासून या फरार आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गोंदिया : शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर फरार आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर न होता हुलकावणी देणाऱ्या त्या आरोपीविरुद्ध न्यायालयाने पकड वाॅरंट जारी केले होते. ४ वर्षांपासून या फरार आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी हा न्यायालयात पेशी तारखेवर हजर होत नसल्याने न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पकड वाॅरंट काढला. त्याची माहिती गोंदिया पोलिसांनी काढल्यावर तो जगदलपूर, (छत्तीसगड) येथे आपले नाव बदलवून राहत आहे, अशी माहिती मिळाली. त्या माहितीवरून त्याला अटक करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला जगदलपूर, जि. बस्तर, (छत्तीसगड) येथे पाठविण्यात आले होते. पोलीस पथकाने फरार आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याचा शोध घेतला असता तो राजेंद्र राजकुमार कुमार अशा नावाने राहत असल्याचे माहिती झाले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे २८ एप्रिल २०२३ रोजी आणण्यात आले.
खन्नाकुमार राजकुमार कुमार (रा. दसखोली, गाैशाला वाॅर्ड गोंदिया) याच्याविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया येथे खटला सुरू असून, तो जामिनावर मुक्त आहे. वाजवी कारणाशिवाय जामिनाच्या बंधपत्राच्या शर्तीनुसार मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया समक्ष पेशीवर हजर राहणे अपेक्षित होते; परंतु तो पेशीवर हजर झाला नाही. त्याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २२९ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस हवालदार सुदेश टेंभरे, कवलपालसिंग भाटीया, पोलीस शिपाई कुणाल बारेवार, मुकेश रावते यांनी केली आहे.
खन्नाकुमारवर हे गुन्हे दाखल -
गोंदिया शहर पोलिसांना हवा असलेला आरोपी खन्नाकुमार राजकुमार कुमार (३०, रा. दसखोली, गोंदिया) याच्याविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात कलम ३९९, ४०२, ३५२, ३२३, सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा, सहकलम ६५ (ख) खंड (ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा, तसेच भादंविचे कलम ३७६ (ड), सहकलम ४, ५ (एल), ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये न्यायालयात खटले सुरू आहेत.