पोलिसाकडूनच लाच घेणारा चार वर्षांसाठी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:40 AM2019-02-03T05:40:56+5:302019-02-03T05:41:13+5:30
राज्य पोलीस मुख्यालयातील निलंबित कार्यालय अघीक्षक बळीराम शिंदे यास एका पोलीस शिपायाकडून लाच घेतल्याबद्दल शनिवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
मुंबई - राज्य पोलीस मुख्यालयातील निलंबित कार्यालय अघीक्षक बळीराम शिंदे यास एका पोलीस शिपायाकडून लाच घेतल्याबद्दल शनिवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पोलिसांनी इतरांकडून लाच घेणे नवीन नाही. पण आपल्याच खात्यातील सहकाऱ्याचे कामही लाच न घेता करण्याची प्रवृत्ती दाखविणारे म्हणून हे प्रकरण विरळा होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दाखल केलेल्या खटल्यात सर्व आरोपांत दोषी ठरवून विशेष न्यायालायचे न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी आरोपी शिंदे यास चार वर्षांच्या कारावासाखेरीज १० हजार रुपये दंडही ठोठावला.
या खटला चालविलेले अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर जे. व्ही. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष भोईटे या पोलीस शिपायाने घरासाठी कर्ज मिळावे यासाठी अर्ज केला होता. ते प्रकरण पोलीस महासंचालक कार्यालयात वर्षभर पडून होते. त्या कार्यालयात अधीक्षक असलेल्या शिंदे याने कर्ज मंजूर करून घेण्यासाठी भोईटे यांच्याकडे २२ हजार रुपयांची लाच मागितली. नंतर घासाघीस करून शिंदेने १० हजारांवर तडजोड केली.
पोलिस शिपाई भोईटे यांनी शिंदे यांना लाच देण्याचा बहाणा करून याची खबर ‘एसीबी’ला दिली. त्यानुसार सापळा रचला गेला व २१ आॅक्टोबर २०१४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनवर भोईटे यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे रंगेहाथ पकडला गेला. यातून उभ्या राहिलेल्या खटल्यात पोलीस खात्यामधीलच नऊ साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींमुले शिंदे याच्यावरील आरोप निर्विवाद सिद्ध होऊन तो गजाआड गेला.