धारावी-घाटकोपरमध्ये शस्त्रांच्या विक्रीप्रकरणी चौघांना बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 09:15 PM2018-09-16T21:15:21+5:302018-09-16T21:15:47+5:30
यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद रिझवान रज्जबअली शेख आणि मोहम्मद मारुफ मोहम्मद हमीद इद्रीसी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडले.
मुंबई- शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत घातक शस्त्रांची विक्रीप्रकरणी चार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत केले आहे. चौघांपैकी दोघांना पोलीस तर दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. धारावी येथे काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी धारावी रेस्ट्रॉरंटजवळ साध्या वेशात पाळत ठेवून सापळा रचला होता. यावेळी तिथे आलेल्या मोहम्मद रिझवान रज्जबअली शेख आणि मोहम्मद मारुफ मोहम्मद हमीद इद्रीसी या दोघांनाही पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे सापडले.
चौकशीत त्यांनी ते तिथे गावठी कट्ट्याच्या विक्रीसाठी आले होते. अटकेनंतर या दोघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना ताजी असतानाच याच पथकाला घाटकोपर परिसरात अन्य काही तरुण शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घाटकोपरच्या नारायणनगर, नागरी सेवा सदर रोडवरील होमगार्ड मुख्यालयजवळ साध्या वेशात पाळत इेवून साजिद अली आसिफअली सय्यद आणि अमजद नवाज खान या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसे जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.