एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने फळ विक्रेत्याला १५ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 05:53 PM2020-07-09T17:53:13+5:302020-07-09T17:54:30+5:30
सायबर चोरटे तब्बल ८ दिवस फळ विक्रेत्याच्या खात्यातुन पैसे काढत होते.
पुणे : बँकेतून अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका घाऊक फळ विक्रेत्याला तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांना आॅनलाईन गंडा घातला आहे.सायबर चोरटे हे त्यांच्या खात्यातून तब्बल ८ दिवस पैसे काढत होते.
याप्रकरणी एका ३८ वर्षाच्या नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घाऊक फळ विक्रेते असून ते कोथरुडमध्ये रहायला आहेत. गेल्या महिन्यात त्यांना सायबर चोरट्याने आपण बँकेमधून बोलत असल्याचे सांगून त्यांचे एटीएम कार्ड अपडेट करायचे असल्याचे सांगितले. त्या बहाण्याने त्यांच्या कार्डची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी रक्कम वर्ग करुन घेतली. याबाबत त्यांनी फोनवर चौकशी केल्यावर त्याने या फळ विक्रेत्याला एटीएम अपडेट होत असून तुमची रक्कम पुन्हा जमा केली जाणार असल्याचे सांगितले.त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. काही दिवसानंतर खात्यात पुन्हा पैसे जमा न झाल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे अधिक तपास करीत आहेत.