कोकण भवनमध्ये नोकरी देतो सांगून फसवणूक; कापड विक्रेत्याला ५ लाख रुपयांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:47 AM2024-10-22T10:47:41+5:302024-10-22T10:48:16+5:30
नदिम इब्राहिम खेडेकर (रा. रोहा, खालचा मोहल्ला) असे या आरोपीचे नाव
लोकमत न्यूज नेटवर्क, रोहा: कोकण भवन येथील सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगत रोहा शहरातील एका खासगी शाळेत शिपाईपदावर काम करणाऱ्या भामट्याने एका ३२ वर्षीय कापड विक्रेत्याला ५ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आरोपी शिपाई फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नदिम इब्राहिम खेडेकर (रा. रोहा, खालचा मोहल्ला) असे या आरोपीचे नाव असून सचिन राजबहादूर खरवार (रा. अष्टमी, रोहिदासनगर, ता. रोहा) याने त्याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
कोकण भवन येथे उच्चपदावर काम करणाऱ्या मॅडमशी माझी ओळख आहे. त्यांना सांगून तेथे तुला नोकरी लावून देतो, असे सांगत खेडेकर याने सचिन खरवार याच्याकडून मे ते जुलै २०२३ दरम्यान ९ लाख ५० हजार रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने त्याने पैसे परत मागितले. तेव्हा खेडेकरने ४ लाख ५० हजार रुपये परत दिले. मात्र, ५ लाख रुपये परत न दिल्याने सचिन खरवार यांनी तक्रार दाखल केली.