ड्रग्ज पार्सल पकडल्याचा कॉल, अन् खाते रिकामे; इंजिनीयर तरुणाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:59 AM2023-01-21T11:59:28+5:302023-01-21T12:00:07+5:30

४३ सिमकार्ड जप्त, अधिक तपास सुरू

Fraud call of drug parcel seized and money withdrawn culprit is Engineer | ड्रग्ज पार्सल पकडल्याचा कॉल, अन् खाते रिकामे; इंजिनीयर तरुणाचा प्रताप

ड्रग्ज पार्सल पकडल्याचा कॉल, अन् खाते रिकामे; इंजिनीयर तरुणाचा प्रताप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तैवानमध्ये तुमचे ड्रग्ज पार्सल पकडले असून प्रकरण तपासाला मुंबई पोलिसांकडे आले असल्याचा कॉल करायचा. सावज जाळ्यात अडकताच कारवाईची भीती दाखवून मुंबईसह राज्यभरातील नागरिकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकचा इंजिनियर तरुण मित्राच्या मदतीने हे रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येत आहे. खुशाल बाबूराव माळी (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या मित्राचा शोध सुरू आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते ९ जानेवारीदरम्यान मुंबईतील तक्रारदाराला आरोपींनी कॉल करून फेडेक्स कुरियर कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदाराचे ड्रग्ज पार्सल तैवानला पाठविल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंद झाल्याचे सांगताच तक्रारदाराला धक्का बसला. त्यापाठोपाठ मुंबई पोलिस अधिकारी असल्याचे सांगून ड्रग्ज पार्सलचे प्रकरण तपासाला आल्याचे सांगून अटकेची भीती घातली. पोलिस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र पाठवून, संबंधित गुन्हा मनी लाँड्रिंगचा असल्याने सीबीआयमार्फत चौकशी सुरू असल्याचेही नमूद केले.

नोकरी सुटल्यानंतर...

नाशिकचा रहिवासी असलेला खुशाल आणि त्याचा साथीदार औरंगाबाद येथे नोकरीला होते. नोकरी सुटल्यानंतर दोघांनीही अशाप्रकारे फसवणूक करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.

४३ सिमकार्ड जप्त

खुशालकडून ४३ सिमकार्ड जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. सायबर विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. बाळसिंग राजपूत, सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. आरोपी प्रत्येक गुन्ह्यानंतर आधीचे सिमकार्ड नष्ट करून नवीन सिमकार्डचा वापर करत होता. अखेर, सतत त्याचा माग काढत पथकाने सुरुवातीला फसवणूक झालेल्या रकमेपैकी १३ लाख ९८ हजार रुपये गोठवले.

Web Title: Fraud call of drug parcel seized and money withdrawn culprit is Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.