फसवणूक प्रकरण : मनपा महिला लिपिकास दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 11:40 PM2020-01-02T23:40:40+5:302020-01-02T23:43:49+5:30
कर संग्राहकपदी नोकरी लावून देण्याची बतावणी करून चौघांचे सहा लाख रुपये हडप करणारी महानगरपालिकेची महिला लिपिक ज्योत्स्ना अविनाश भिवगडे (४०) हिला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर संग्राहकपदी नोकरी लावून देण्याची बतावणी करून चौघांचे सहा लाख रुपये हडप करणारी महानगरपालिकेची महिला लिपिक ज्योत्स्ना अविनाश भिवगडे (४०) हिला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. प्रकरणातील दुसरा आरोपी सदानंद गोपाळ जनबंधू (५२) याला पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. न्या. एस. डी. मेहता यांनी या खटल्यावर निर्णय दिला.
भिवगडे वैशालीनगर तर, जनबंधू पाचपावली येथील रहिवासी आहे. भिवगडेला भादंविच्या कलम ४२० व कलम ४६८ अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास तर, कलम ४६५ व कलम ४७१ अंतर्गत प्रत्येकी एक वर्ष कारावास व २५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस चौकशीनुसार, २०१३ मध्ये भिवगडेने कर संग्राहक पदाचे बनावट नियुक्ती आदेश तयार केले होते. तसेच, ते खरे असल्याचे सांगून संदीप बावणे व योगेंद्र अंबादे यांच्याकडून प्रत्येकी १ लाख ९० हजार तर, पल्लवी व दीप्ती सहारे या बहिणींकडून २ लाख १५ हजार असे एकूण ५ लाख ९५ हजार रुपये घेतले व त्यांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघडक ीस आल्यानंतर मनपा कर्मचारी विजय बागल यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला होता. तसेच, भिवगडेला ७ नोव्हेंबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. जाधव यांनी प्रकरणाचा तपास केला. सरकारतर्फे अॅड. समीर दुंगे यांनी कामकाज पाहिले.