तळवलकर्ससह इनशेपच्या संचालकावर फसवणुकीचा गुन्हा; बँकेची ३४ कोटी ८८ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:51 AM2021-12-17T06:51:52+5:302021-12-17T06:53:14+5:30
हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तळवलकर्स विरोधातील हा तिसरा गुन्हा आहे.
मुंबई : व्यायामशाळा क्षेत्रातील प्रसिद्ध तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड आणि इनशेप हेल्थ अँड फिटनेस कंपनीच्या ५ संचालकांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बँकेची ३४ कोटी ८८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तळवलकर्स विरोधातील हा तिसरा गुन्हा आहे.
नरिमन पॉइंट येथील साऊथ इंडीयन बँकेत कार्यरत असलेले ऋषिकेश यशवंत सावंत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इनशेप हेल्थ अँड फिटनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक दिनेश श्रीनिवास राव, राजेंद्रन, जवाहर दीपा, अदित्य सिंग धिल्लन तसेच तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे संचालक हर्ष भटकळ व इतर साथीदारांनी बँकेची फसवणूक केली. बंगळुरू येथे नवीन जीम सुरू करण्यासाठी बँकेकडून २०१८ मध्ये ३८.७६ कोटी कर्ज घेतले. मात्र, ज्यासाठी कर्ज घेतले त्याचा वापर केला नाही. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर २०१९ पासून हप्ते भरणे बंद केले. तसेच दिलेल्या कर्जापैकी अवघे ३ कोटी ४३ लाख रुपयांची परतफेड केल्याचा आरोप त्यांनी केला.
बँकेच्या चौकशीत, कर्जाची पूर्ण रक्कम इंटेरियर व जीमच्या साहित्यासाठी खर्च करणे अपेक्षित असतानाही जीममध्ये साहित्य आढळले नाही. शिवाय २० जीमपैकी १२ जीम कार्यरत नसल्याचेही आढळले. इनशेपच्या मालकीचा न्यूफॉर्म स्टुडिओने अंध्रा बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांनासुद्धा यापैकी १३ जीम तारण असल्याचे आढळले. यासाठी बँकेची एनओसीही घेतली नाही. तसेच सप्टेंबर २०१९ पासून कंपनीने दैनंदिन कलेक्शन बंद करत, येणारे कलेक्शन हे पीडब्लूजी फिटनेस प्रा. लि. बंगळुरूकडे वळते केल्याचेही दिसून आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
ॲक्सिस बँकेचे २०६ कोटींचे बुडीत कर्ज
२०१६ ते २०१९ या कालावधीत ॲक्सिस बँकेची २०६ कोटी ३५ लाखांच्या फसवणुकीच्या आरोपावरून तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.चे गिरीश मधुकर तळवलकर, प्रशांत सुधाकर तळवलकर, विनायक गवांदे, अनंत गवांदे, हर्ष भटकर, मधुकर विष्णू तळवलकर, दिनेश राव व गिरीश नायक यांच्याविरोधात १४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सहा महिने प्राथमिक चौकशी ही कारवाई केली. त्यापाठोपाठ अन्य बँकांनीही तक्रारीसाठी पोलिसांत धाव घेतली. पश्चिम उपनगरातही एक गुन्हा नोंदवत तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.