बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची फसवणूक, पावणेआठ कोटी लाटले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:43 AM2021-08-16T05:43:36+5:302021-08-16T05:44:05+5:30
Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील माण येथे ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लीम ट्रस्टच्या मालकीची सुमारे ८ हेक्टर ५७ आर जागा आहे.
मुंबई/पुणे : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या तब्बल पावणेआठ कोटी रकमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे. औरंगाबाद येथील वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) सादर करून ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून ही पोलिसांनी इम्तियाज महंमद हुसेन शेख आणि चाँद मुलाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे ८ डिसेंबर २०२० ते २ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील माण येथे ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट या मुस्लीम ट्रस्टच्या मालकीची सुमारे ८ हेक्टर ५७ आर जागा आहे. यापैकी ५ हेक्टर ५१ आर जमीन शासनाने राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक ४ साठी अधिग्रहण केली. त्याचा मोबदला ९ कोटी ६४ लाख ४२ हजार ५०० रुपये मंजूर केला होता. ही रक्कम ट्रस्टला मिळाली नसल्याने ट्रस्टींनी वक्फ बोर्डाला कळविले. त्यानंतर खान यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला.
इम्तियाज शेख यांनी ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टकडे विश्वस्त नियुक्तीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी बनावट ना हरकत पत्र उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सरकारी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून ७ कोटी ७६ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मिळविला. तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून फसवणूक केली.
गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले
वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण, काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री