ट्रस्टी, देणगीदार, एजंटांना करोडोंचा गंडा; पुण्यातील ८७ कोटींच्या बनावट नोटा प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 09:11 PM2020-06-15T21:11:10+5:302020-06-15T21:15:45+5:30
आरोपी लान्स नायक आपण हैदराबाद येथील निजामाचे वंशज असल्याचे सांगत व त्यांची मोठ्या प्रमाणावर रोकड आपल्याकडे असल्याचा द्यायचा हवाला..
पुणे : बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सुत्रधार लान्स नाईक शेख अलीम समद गुलाबा हा आपण हैदराबाद येथील निजामाचे वंशज असल्याचे सांगत व त्यांची मोठ्या प्रमाणावर रोकड आपल्याकडे असल्याचा हवाला देऊन ट्रस्टी, देणगीदार,एजंट यांना करोडोचा गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी त्याने भाडेतत्वावर घेतलेल्या बंगल्यात काही प्रतिमाही लावल्या होत्या. त्यावरुन अनेक जण त्याच्या जाळ्यात अडकले आहेत. लान्स नाईक अलीम याच्यासह सुनिल सारडा (वय ४०), अब्दूल गणी रहेमत्तुल्ला खान (वय ४३), अब्दुर रहेमान अब्दुलगणी खान (वय १९), रितेश रत्नाकर (वय३४) आणि तुफेल अहमद महमद इशोक खान (वय २८) या सर्वांच्या पोलीस कोठडीत २०जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ८७ कोटी रुपयांच्या बनावट तसेच खऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात, अलीम खान हा चिल्ड्रन्स बँकेचे नोटांचे वर खऱ्या नोटा लावून त्याची थप्पी त्याच्या भाड्याने घेतलेल्या बंगल्याच्या खोलीत ठेऊन त्याच्यावर आजचे वर्तमानपत्र ठेवून त्याचे व्हिडिओ बनवत होता. ते व्हिडिओ तो त्याच्या एजंट यांना पाठवत होता. ते एजंट पुढे ट्रस्ट अधिकारी, देणगीदार कंपन्या व इतर मध्यस्थांना देऊन त्यांच्याकडे रोख रक्कम असल्याची खात्री पटवत होते. त्याद्वारे त्यांना कमिशन मिळत होते.अलीम खान याने मागील ६ महिन्यात अशा प्रकारे २५ ते ३० व्हिडिओ बनवून त्याद्वारे कमिशन पोटी आर्थिक फायदा करून घेतला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या ६ जणांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सांगितले की,आरोपींची टोळी असून, अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यातून मिळविलेली रक्कम ही करोडो रुपयांच्या घरामध्ये आहे व त्याने मिळविलेली रक्कम ही जमीन, मालमत्ता, महागड्या गाड्या खरेदी करणे यामध्ये गुंतवली आहे. त्याचा तपास करायचा आहे. अलीम खान याने जप्त केलेली बनावट करन्सी ही मुंंबई येथून तर अमेरिकन डॉलर एका मध्यस्थामार्फत हैदराबाद येथून घेतल्याचे सांगतो. तेथे जाऊन तपास करायचा आहे. सुनिल सारडा याने अलिम खान याचे बँक खात्यात ११ वेळा व्यवहार केले असून त्यामध्ये वेळोवेळी २५ हजार ते ५० हजार रुपयांच्या रक्कमा भरल्या आहेत. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचा ठावठिकाणा शोधून काढायचा आहे. त्यामुळे सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. तर, आरोपी हे खेळण्यांच्या नोटांचे व्यापारी आहेत. या नोटा फसवणुकीसाठी वापरल्या नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे अॅड. हेमंत झंजाड, अॅड.पुष्कर दुर्गे यांनी केला.