खरवस विक्रीच्या बहाण्याने वृद्ध दाम्पत्याची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 03:54 PM2019-07-13T15:54:22+5:302019-07-13T15:55:23+5:30
शहरात सध्या खरवस, म्हशीचा चीक विकायचा असल्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन दागिने लांबविणाऱ्या टोळीने धुडगुस घातला आहे़.
पुणे : खरवस, म्हशीचा चीक विकायचा असल्याचा बहाणा करुन घरात प्रवेश करुन ज्येष्ठांच्या गळ्यातील दागिन्यांप्रमाणे दागिने बनवायचे असल्याचे सांगून दागिने लांबविणाऱ्या टोळीने शहरात सध्या धुडगुस घातला आहे़. त्यांच्या या बहाण्याला कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीमधील एक वृद्ध दाम्पत्य शिकार झाले आहे़. बाहेर उभ्या असलेल्या वडिलांना दागिने दाखवून आणतो असे सांगून त्यांनी त्यांच्याकडील ७५ हजार रुपयांचे दागिने हातोहात लांबविले़.
याप्रकरणी प्रभाकर भास्कर गोसावी (वय ८८, रा़ नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गोसावी हे आपल्या पत्नीसह बंगल्याच्या तळमजल्यावर राहतात़. वरच्या बाजूला त्यांचे नातू व इतर जण राहतात़. त्यांच्या बंगल्यात शुक्रवारी सकाळीच पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दोघे जण आले़. त्यांनी गोसावी यांच्या पत्नीला खरवस विक्रेते असल्याचे सांगितले़. त्यावेळी प्रभाकर गोसावी यांनी चौकशी केल्यावर त्यांना तुम्हाला ओळखतो़ लग्न पत्रिका देण्यासाठी आलो असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला़. त्यानंतर त्यांनी गोसावी यांना तुमच्या गळ्यातील सोन्याच्या चैन व हातातील अंगठीचे डिझाईन बघण्यासाठी मागितले़ ते पहाण्याचा बहाणा करुन आम्हालाही अशाच डिझाईनचे दागिने करायचे आहेत़ असे सांगून वडील बाहेर थांबवले आहेत, त्यांना दाखवून आणतो, असे सांगून ते ७५ हजार रुपयांचे ३१ ग्रॅम सोनसाखळी व अंगठी घेऊन पटकन निघून गेले़. काही वेळाने गोसावी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला़.
यापूर्वी सुमारे दीड महिन्यांपूर्वी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एका महिलेची फसवणूक करण्यात आली होती़. तसेच भारती विद्यापीठ, समर्थ या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही असेच फसवणुकीचे प्रकार घडले होते़. त्यातील फिर्यादीने सांगितलेले चोरट्यांचे वर्णन आणि या घटनेतील चोरट्यांचे वर्णन यात साम्य दिसून येत आहे़.
वडगाव ब्रुद्रुक परिसरात एका वृद्ध दाम्पत्याला म्हशीचा चीक देण्याचा बहाणा करुन बोलण्यात गुंतविले़. त्यानंतर त्यांच्या पत्नीला तुमव्या गळ्यातील मंगळसुत्र छान दिसते़ असेच डिझाईने मंगळसुत्र आम्हाला करायचे आहे, असे सांगितले व २ हजार रुपयांची नोट सुटी करुन घेऊन येतो, असे सांगून चोरटे पळून गेले होते़.
कोथरुड परिसरात एका दाम्पत्याला म्हशीचा चीक देण्याचा बहाणा करुन १ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले होते़. कात्रज येथील राजस सोसायटीत राहणारे श्रीभुषण कुलकर्णी यांना तिघांनी हाक मारुन आम्ही शेजारच्या गोठ्यातून चीक आणला आहे़, असे सांगून गाईसाठी गहू किंवा तांदुळ द्या अशी मागणी केली़. त्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने ते स्वयंपाकघरात शिरले़. कुलकर्णी यांच्या आईला बोलण्यात गुंतवून तुमच्या गळ्यातील दागिने छान आहेत, असे म्हणून पहायला घेऊन दागिने घेऊन फरार झाले़.