बदलीची सवलतीसाठी फसवणूक, रावेरला सहा ग्रामसेवकांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:36 PM2022-07-21T23:36:00+5:302022-07-21T23:43:39+5:30
गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.
- चुडामण बोरसे
रावेर जि. जळगाव : बदलीच्या सवलतीसाठी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा ग्रामसेवकांविरूध्द गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे.
शिवाजी गुलाबराव सोनवणे (३५, मस्कावद), राहुल रमेश लोखंडे (३६, कोचुर बुद्रुक), छाया रमेश नेमाडे (४२, मांगी), नितीन दत्तू महाजन ( ३७, गहुखेडा), रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी (४७, पुरी गोलवाडे) आणि शामकुमार नाना पाटील (४८, सिंगत) अशी गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकांची नावे आहेत.
या सर्वांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार केला. त्या बोगस कागदपत्रांचा गैरवापर करीत शासनाची फसवणूक केली आणि बदलीतून सवलत मिळविण्याचा प्रयत्न केला, असा ठपका ठेवण्यात आला आहे. किशोर भिवा तायडे यांनी याबाबत फिर्याद दिली. रावेर येथे वैयक्तिक शौचालय घोटाळ्यात पंचायत समितीशी संबंधित १२ जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल आहे.
रावेर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाअंती संबंधित आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करून न्यायालयाच्या पुर्व परवानगीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- मनोहर जाधव, पोलीस उपनिरीक्षक, रावेर.