आधार कार्डच्या मदतीने फसवणूक, महिला डॉक्टरच्या खात्यातून 70 लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:50 PM2022-01-13T14:50:10+5:302022-01-13T14:50:38+5:30
Fraud : महिलेने जेव्हा आयकर विवरणपत्र भरले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नवी दिल्ली : आजच्या काळात आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. बँक खाते उघडण्यापासून ते प्रत्येक सरकारी कामापर्यंत आधारकार्डची गरज भासते. मात्र आता आधार कार्डच्या मदतीने फसवणुकीचे प्रकारही घडू लागले आहेत. अशीच एक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली असून, महिला डॉक्टरच्या आधार कार्डमध्ये छेडछाड करून 70 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण हरयाणामधील रोहतकच्या सुभाष नगरमधील आहे, जिथे फसवणूक करणाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या आधार कार्डवरून 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. महिलेने जेव्हा आयकर विवरणपत्र भरले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या आधार कार्डचा वापर करून बँकेत खाते उघडले आणि त्यानंतर बँक आणि फायनान्स कंपन्यांकडून सुमारे 70 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या संपूर्ण प्रकरणाची महिलेला कल्पना नव्हती.
दरम्यान, अशी फसवणूक तुमच्यासोबतही होऊ शकते. ती टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.
- तुमचे आधार कार्डसोबत ठेवा आणि कोणालाही देऊ नका.
- बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तुमचा आधार क्रमांक कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.
- UIDAI अॅपद्वारे आधार कार्ड लॉक आणि अनलॉक करण्याचा पर्याय दिला जातो. तुम्हाला गरज नसताना आधार क्रमांक लॉक करा आणि आवश्यक असेल तेव्हा तो अनलॉक करा. त्यामुळे आधारचा गैरवापर टाळता येईल.
- अनोळखी लोकांकडून फोन कॉल आल्यास ईमेल किंवा मेसेजमध्ये आधार क्रमांक, ओटीपी, वैयक्तिक किंवा बँक डिटेल्स देऊ नका.
- डिजिटल आधार कार्ड मोबाईलमध्ये स्टोअर जेणेकरून आधार कार्ड हरवण्याचा धोका कमी होईल.
- तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करा, जेणेकरून त्याच्याशी संबंधित मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.