मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 09:47 AM2024-08-12T09:47:02+5:302024-08-12T09:47:34+5:30
विलास गमरे, अरविंद पवार या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मंत्रालयीन कर्मचारी असल्याचे भासवून दोघांनी एका महिलेला आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवत पावणेपाच लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालयाचे बनावट नियुक्ती पत्र देत विलास गमरे आणि अरविंद पवार या भामट्यांनी मंत्रालयातच पैसे घतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भांडुपमधील ४५ वर्षीय तक्रारदार महिला नोकरीच्या शोधात असताना, एका व्यक्तीने त्यांना जुलै २०२२ मध्ये मंत्रालयात लिपिक पदावर भरती सुरू असून, विलास गमरे हे काम करून देतील, असे सांगितले. या महिलेने पतीसह मंत्रालयात गमरे याची भेट घेतली. गमरेने लिपिक पदाच्या नोकरीसाठी मराठी टायपिंग शिकण्यास सांगत दोन लाख रुपये मागितले. आठवडाभराने तक्रारदार महिलेने पतीसह मंत्रालयात चौथ्या मजल्यावरील आरोग्य विभागात जात गमरेला पैसे दिले. तसेच, टायपिंग शिकायला सुरुवात केली. ऑक्टोबर २०२२ मध्ये गमरेने महिलेची अरविंद पवारशी ओळख करून दिली. पवारने मंत्रालयातच संगणकावर सुचिता यांची दोनदा टायपिंग परिक्षा घेतली. त्यानंतर गमरे आणि पवारने पुढचे काम करण्यासाठी आणखी ७५ हजार रुपये घेतले आणि अधिवेशन झाल्यानंतर नोकरीचे काम होईल, असे सांगितले.
- फेब्रुवारी २०२३ मध्ये टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या पतीने नोकरीचा पाठपुरावा वेगाने सुरू केला, तेव्हा ६ मार्च २०२३ रोजी गमरे याने महिलेला दूरध्वनी करत सरकारी आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी लागल्याचे पत्र देतो, असे सांगत त्यांच्याकडून आणखी दोन लाख रुपये उकळले.
- विश्वास संपादन करण्यासाठी महिलेला आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालय आवार या नावाने सरळ सेवेने नियुक्तीबाबतचे पत्रही दिले. त्यांची १७ एप्रिलला सेंट जॉर्ज रुग्णालयात वैद्यकीय तपासणी पार पडली. त्यानंतर दोघांनी कॉल घेणे बंद केल्याने तक्रारदार महिला आणि पतीने आरोग्य विभागात चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडील नियुक्ती पत्र खोटे असल्याचे समोर आले.
- आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने मरिन ड्राइव्ह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, पोलिस तपासात विलास गमरेविरुद्ध अशाच प्रकारे फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले.