चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 09:02 PM2021-05-01T21:02:43+5:302021-05-01T21:03:02+5:30
२७ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणार्या टोळीचा पुणे पोलिसांनी पडदा फार्श केला आहे़ लष्करातील कर्मचार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (वय ३६, रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मुळ गाव ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून जुन्या बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ खर्या नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणार्या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना अण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतला.
त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांची ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर पुन्हा गेला नसल्याचे समजते. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टी काम करत असून शुटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे.
असा रचत असत फसवणुकीचा कट
ही टोळी एखादे सावज हेरत. त्याला एक केंद्र सरकारचे बनावट सक्युलेशन दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडिओ दाखवत. त्यात ते वर १ हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून खाली बनावट नोटाचे बंडल असे. त्यानंतर त्यांना एखादा बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खर्या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करुन देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशन पोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. सातार्यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने धायतिडक याला अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.