सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; मुरबाडमधील प्रकार, ३० ते ४० हजार उकळतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:26 PM2021-03-27T23:26:07+5:302021-03-27T23:26:21+5:30

प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर २४ तास ड्युटी लावली जाते. मात्र प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींना दरमहा संबंधित हाॅस्पिटलकडून फक्त एक हजार रुपये स्टायपेंड दिले जाते

Fraud in the lure of government jobs; Types in Murbad, 30 to 40 thousand boil | सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; मुरबाडमधील प्रकार, ३० ते ४० हजार उकळतात

सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक; मुरबाडमधील प्रकार, ३० ते ४० हजार उकळतात

Next

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील धसई, म्हसा, सरळगाव या ठिकाणी साई सेवा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ही संस्था दहावी, बारावी पास तरुणींना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३० ते ४० हजार उकळते.  याबाबत  तालुका  आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी संस्थेची पाहणी केली. ही संस्था  बोगस असून  केवळ  आरोग्यविषयक ज्ञान देते.  त्यांना कोणत्याही प्रकारे नर्सिंग अभ्याक्रम प्रमाणपत्र किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

मुरबाड तालुक्यात सहा ते सात वर्षांपासून नाशिक येथील जयवंत गायकवाड हे दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणींसाठी ही संस्था चालवत आहेत. ३० ते ४० हजार रुपये घेऊन सहा महिने प्रशिक्षण दिले जाते. नंतर दीड वर्षे नाशिक येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थीं म्हणून पाठविले जाते. सध्या कोरोनामुळे सर्व क्लासेस बंद असताना येथे कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता क्लास घेतले जातात.

प्रशिक्षणासाठी पाठवल्यानंतर २४ तास ड्युटी लावली जाते. मात्र प्रशिक्षणासाठी येणाऱ्या तरुणींना दरमहा संबंधित हाॅस्पिटलकडून फक्त एक हजार रुपये स्टायपेंड दिले जाते. संस्था या प्रशिक्षणार्थींकडून जबरदस्तीने वार्षिक फी व परीक्षा शुल्क आकारते. प्रवेश घेताना ज्या मुलींना आई किंवा वडील नाहीत त्यांना आम्ही दत्तक घेतो. त्यांना सरकारी नोकरी शंभर टक्के लावण्याची हमी देतो. तसेच त्यांच्या लग्नाला ५० हजारांची मदत देतो अशा प्रकारची आमिषे दाखविली जातात. परंतु  गेल्या पाच ते सहा वर्षांत या संस्थेने एकाही तरुणीस सरकारी नोकरी दिली नाही किंवा दत्तक घेतलेले नाही. 

अंकिता राऊत या मुलीने वडिलांच्या निधनामुळे दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला. ती प्रशिक्षणासाठी नाशिक येथे असताना १७०० रुपये परीक्षा शुल्क भरण्यासाठी सांगितले, मात्र पैसे नसल्याने नाशिकहून मुरबाड येथे पाठविले. तिच्या आईने पैशाची तजवीज करून मुलीला पैसे भरण्यासाठी मुरबाड येथील संस्थेत पाठविले असता १७०० रुपयांची पावती दिली नाही. तसेच परीक्षा कुठे होईल याची माहिती दिली नाही. त्यामुळे  तिला आपली फसवणूक होत आहे असे समजले असता नातेवाइकांनी डॉ. बनसोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संस्थेची पाहणी केली असता या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीस कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग संस्थेने महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची परवानगी घेऊन हे पॅरामेडिकल कोर्स सुरू करावेत, असा आरोग्य विभागाचा नियम आहे. त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्याचे अधिकार मुरबाड नगरपंचायतीला असल्याने ते पुढील निर्णय घेतील. सध्या त्यांनी संस्थेला प्रवेश घेणे बंद करण्याचे, क्लासही घेऊ नका असे सांगितले आहे. - डॉ. श्रीधर बनसोडे, आरोग्य अधिकारी 

आमची संस्था ही पॅरामेडिकल असल्याने तेथे सहायक परिचारिका हा कोर्स शिकविला जातो. महाराष्ट्र नर्सिंगची परवानगी घेण्यासाठी संस्थेची स्वतंत्र जागा तसेच सुमारे ५० लाखांची अनामत रक्कम ठेव अशा अटी असल्याने संस्थेची तशी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आहे त्याच परिस्थितीत चालवतो. पुढे काय करायचे याबाबत आम्ही ठरवत आहोत.- संदीप गायकवाड,   संस्थेचे अध्यक्ष

 

Web Title: Fraud in the lure of government jobs; Types in Murbad, 30 to 40 thousand boil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.