बनावट कागदपत्रांद्वारे म्हाडाचे घराचे आमिष दाखवून फसवणूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 09:23 PM2018-09-10T21:23:30+5:302018-09-10T21:23:44+5:30
कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे.
मुंबई – म्हाडाच्या फ्लॅटचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीस काल गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अब्ररार अहमद युसूफ असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यातील अब्ररार हा सहावा आरोपी असून यापूर्वी याच गुन्ह्यात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात कैलास कृष्णा चवरकर, गज्याभाई ऊर्फ गजेंद्र भिमा नायडू, मोहम्मद नासीर मोहम्मद जाहिद हुसैन, शाहुल हमीद अब्दुल्ला शेख आणि प्रतीक वसंत थोरात यांचा समावेश आहे.
या टोळीने आतापर्यंत 70 ते 80 जणांना म्हाडाचे बोगस दस्तावेज देऊन त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. खार परिसरात काहीजण म्हाडाच्या फ्लॅटची बनावट विवरणपत्रे आणि इतर बोगस दस्तावेज तयार करून एका व्यक्तीला देण्यासाठी येणार आहे, अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने खार आणि वांद्रे येथून मोहम्मद नासीरसह तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अब्ररार याचे नाव आले होते. अब्ररार हा भंगार विक्रेता असून तो म्हाडाचा एजंट म्हणून काम करीत होता. त्यानेच अनेकांना आरोपींकडे घरासाठी आणले होते. त्यांच्याकडून घेतलेले पैसे त्याने आरोपीपर्यंत पोहचविले होते. त्यात त्याला काही रकमेचे कमिशन मिळाले होते.
तपासात ही माहिती उघडकीस येताच त्याला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.