नागपुरात मुद्रा लोनच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:20 PM2020-02-21T23:20:55+5:302020-02-21T23:23:07+5:30
मुद्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून बजाज फायनान्सच्या एका ग्राहकाची ४५ हजार रुपयांनी फसवणूक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुद्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवून बजाज फायनान्सच्या एका ग्राहकाची ४५ हजार रुपयांनी फसवणूक केली. भीमनगर येथील रहिवासी विकास नागदेवते हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांनी ९ महिन्यापूर्वी बजाज फायनान्समधून १.३० लाख रुपयांचे घर कर्ज घेतले होते. प्रत्येक महिन्याला ९ हजार रुपये कर्जाच्या रुपात भरत होते. डिसेंबर महिन्यात ९६२३७८३११५ या क्रमांकावर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने विकास नागदेवते यांना मुद्रा लोन मिळवून देण्याचे आमिष दाखविले. मुद्रा लोनवर व्याज कमी असल्याने विकासने त्याला होकार दिला.
फोन करणाऱ्याने विकासला मुद्रा लोन मंजूर करण्यासाठी मोबाईलवर ओटीपी येत असल्याचे सांगितले. विकासच्या मोबाईलवर चार वेळा ओटीपी नंबर आला. ओटीपीनंतर त्यांनी आरोपीला सांगितले. त्या आधारे आरोपीने बजाज फायनान्स येथून ४५ हजार रुपयाचे कर्ज घेऊन मनीषनगर येथील एका डिपार्टमेंटल स्टोअर्समधून ऑनलाईन खरेदी केली. फेब्रुवारी महिन्यात बजाज फायनान्सने विकास यांना ४५ हजार रुपयांच्या कर्जाचा हप्ता भरला नसल्याचे सांगितले. परंतु विकासने कर्ज घेतलेच नाही, असेही सांगितले. त्यामुळे बजाज फायनान्सचे अधिकारी त्याच्यावर किश्त भरण्यासाठी दबाव टाकू लागले. त्यामुळे विकासने सायबर सेलकडे याची तक्रार केली. सायबर सेलने प्रकारणाचा तपास केल्यावर विकासच्या नावावर एका अन्य व्यक्तीने ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सायबर सेलने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांचा संशय आहे की, विकासने कर्जासाठी दस्तावेज बजाज फायनान्समध्ये जमा केले होते. ते मिळवून आरोपीने कर्ज घेतले आहे. बजाज फायनान्सने कर्ज घेणाऱ्याची पडताळणी केली नाही. बजाज फायनान्सच्या नावावर अनेक लोक फसले आहेत. पोलिसांनी वेळोवेळी प्रकरण दाखल सुद्धा केले आहे. बहुतांश प्रकरणात ग्राहकांकडून माहिती लीक झाल्यामुळे फसवणूक झाली आहे. पोलिसांंनी फायनान्सच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याची चेतावणी सुद्धा दिली नाही. पोलीस अधिकारी अमोल दौंड म्हणाले की, फसवणुकीने अशा प्रकरणात वाढ झाली आहे.