नागपुरातील प्लॉट खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक; पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:04 PM2018-07-23T15:04:14+5:302018-07-23T15:06:55+5:30
अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
नागपूर येथील लक्ष्मी नगर चौकातील रहिवासी सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांची मे. रेवती असोसिएट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, या कंपनीचे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या कान्होलीबारा परिसरातील प्लॉट विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात अकोल्यातील वर्तमानपत्रात दिली. आनंद गोमाजी चव्हाण रा. गायत्री नगर यांनी या दोघांची भेट घेऊन २१ डिसेंबर २०११ रोजी १ हजार ७४३ चौरस मीटर प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. त्यानंतर ४ लाख ३५ हजार ९०२ रुपये बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून दर महिन्याच्या किस्तीद्वारे रेवती असोसिट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडे जमा केले. त्यानंतर प्लॉट खरेदी करण्यासाठी विनंती केली असता सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे या दोघांनी त्यांची टाळाटाळ सुरू केली. चव्हाण यांनी मोरे यांची भेट घेऊन तक्रार करण्याचे म्हणताच मोरे दाम्पत्याने त्यांना त्यांचा प्लॉट २५ डिसेंबर २०१६ पूर्वी खरेदी करून देणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले व खरेदी न केल्यास एक धनादेश दिला; मात्र त्यानंतरही खरेदी करून न दिल्याने चव्हाण यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो परत आला. त्यामुळे आनंद चव्हाण यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. यावर मोरे दाम्पत्याने तडजोड करण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचात उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले; मात्र उपस्थित राहिले नाही. जिल्हा ग्राहक मंचाने सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांच्या मे. रेवती असोसिएट्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने आनंद चव्हाण यांना ४ लाख ८६ हजार ९०२ दोन रुपये १० टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश दिला. यासोबतच १० हजार रुपये मानसिक त्रासापोटी देण्याचेही आदेशात नमूद आहे.