नागपुरात पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:25 PM2020-02-26T22:25:05+5:302020-02-26T22:25:58+5:30
पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी करून एका युवतीची ४४ हजाराने फसवणूक करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी या प्रकारची फसवणूक केलेली ही दोन दिवसातील दुसरी घटना आहे. इमामवाडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
रुचिरा कडबकर या इमामवाडा येथे राहतात. त्या गृहिणी आहेत. त्यांना १४ फेब्रुवारीला मोबाईलवर ७८६६९३९९८५ या क्रमांकावरून कॉल आला. त्याने रुचिरा यांना त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बचत खात्यातून पेटीएम केवायसी अपडेट करण्याची बतावणी केली. रुचिरा यांनी पेटीएम अकाऊंट नसल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्यास नकार दिला. आरोपींनी त्यांना सांगितले की, केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. असे न केल्यास त्यांचे अकाऊंट ब्लॉक होईल. त्यांनी रुचिराला प्ले स्टोरवरून क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. रुचिराने ते अॅप डाऊनलोड केले. त्यांनी अॅपमध्ये बचत खाते आणि डेबिट कार्डची माहिती दाखल करण्यास सांगितले. रुचिराने संपूर्ण माहिती त्या अॅपवर टाकली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४४ हजार रुपये उडविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रुचिरा यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. रुचिराला ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आला तो हरियाणा येथील असल्याचा संशय आहे. पोलीस क्रमांकाच्या आधारावर आरोपीचा शोध घेत आहेत. दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे. याच पद्धतीने पेटीएम अकाऊंट ब्लॉक झाल्याची बतावणी करून वीज विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अनिल काशीकर यांची ७५ हजाराने फसवणूक करण्यात आली होती. त्यांनाही सायबर गुन्हेगारांनी अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे उडवले.