जमिनीच्या व्यवहारात १ लाख ७० हजारांची फसवणूक!
By नामदेव भोर | Updated: July 6, 2023 15:49 IST2023-07-06T15:47:01+5:302023-07-06T15:49:54+5:30
व्यवहार करण्यासाठी नातेवाइकांना आणायचे कारण देऊन आणखी ७० हजार रुपये घेतले.

जमिनीच्या व्यवहारात १ लाख ७० हजारांची फसवणूक!
नाशिक : जमिनीचा व्यवहार करतो असे म्हणून सुमारे एक लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित अनिल सदू तालखे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण तुकाराम नवसागर (वय ४०, मानस सेवा केंद्र, निसर्ग कॉलनी पाथर्डी शिवार) यांना अनिल सदू तालखे याने वडिलांची राजूर बहुला येथील जमीन विकायची असल्याची बतावणी केली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०२१ मध्ये डॉ. चंद्रशेखर जाधव यांच्यासह सदू तालखे यांना घरी आणून जागेच्या व्यवहाराबाबत बोलणी झाली. त्यावेळी अनिल तालखे व्यवहार बघेल, असे सांगून ५ हजार रुपये गुंठा याप्रमाणे व्यवहार ठरला.
८ डिसेंबर २०२१ रोजी अनिल तालखे अचानक मानस सेवा केंद्र येथे आला. त्याने नवसागर यांना आईला कॅन्सर झाल्याचे सांगून पैशाची मागणी केली. त्यामुळे नवसागर यांनी त्याला ५० हजार रुपयांचा चेक दिला. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या कारणाने तालखे याने पैसे घेतले. तसेच व्यवहार करण्यासाठी नातेवाइकांना आणायचे कारण देऊन आणखी ७० हजार रुपये घेतले.
एकूण एक लाख ७० हजार रुपये घेतले. मात्र, जमिनीचा व्यवहार होईल असा विश्वास ठेवून वेळोवेळी पैसे देऊनही तालखे याने व्यवहार पूर्ण केला नाही. व पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे नवसागर यांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्यांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी या प्रकरणात अनिल तालखे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.