पंतप्रधानांचा फोटो दाखवून ३ कोटींचा गंडा, एनआरआयकडून ज्वेलर्सची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 08:22 AM2022-12-21T08:22:03+5:302022-12-21T08:22:28+5:30
आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबतचे त्याचे फोटो दाखवून गंडा घातला.
मुंबई : जुहू पोलिसांनी दीपक केवडिया या अनिवासी भारतीयावर (एनआरआय) जुहू येथील एका ज्वेलर्सची ३.३९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबतचे त्याचे फोटो दाखवून गंडा घातला.
तक्रारदार, किशनलाल जैन (४५) यांचे अंधेरीत ओम शिल्पी ज्वेलर्स ॲन्ड जेम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचे दुकान आहे. तर, केवडिया हा न्यू जर्सीचा रहिवासी असून, त्याची तिथे हिऱ्याची कंपनी आहे. जैन २०१७ फ्लॅट भाड्याने घेण्याच्या निमित्ताने रिअल इस्टेट एजंटमार्फत जुहूत फ्लॅट असलेल्या केवडियाच्या संपर्कात आले. केवडिया अमेरिकेत असल्याने त्याने फरिया मयूर विनोद याला पॉवर ऑफ ॲटर्नी दिली. चार महिन्यांनंतर केवडिया भारतात आल्यावर त्याने जैन यांना सांगितले की त्याची हिऱ्यांची कंपनी असून, त्यांचे हिरे अमेरिकेत चांगल्या दराने विकले जातील. त्याच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथसिंह यांनी पुरस्कार प्रदान करतानाचे फोटो दाखवले. हिऱ्याच्या विक्रीच्या बदल्यात चांगले पैसे मिळतील असेही म्हणाला.
हिरे विकले, पण पैशांचा पत्ताच नाही
हिऱ्यांचा व्यवसाय भरवशावर चालतो याचा फायदा घेत जैन यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी दि. २ फेब्रुवारी, २०२२ मध्ये केवडियाला सुमारे ३.३९ कोटी रुपयांचे हिरे विकले, पण त्याने जैन यांना पैसे दिले नाही.
उलट २५ जुलैला खोली रिकामी करण्याची नोटीस पाठविली. जैन यांच्या पैशांमध्ये भाडे ॲडजस्ट करू असे केवडियाने सांगितले होते. पैसे न मिळाल्याने जैन यांनी कोर्टात धाव घेतली.
ज्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याचे सांगितले.