एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
By राजेश भोस्तेकर | Published: September 28, 2023 03:10 PM2023-09-28T15:10:38+5:302023-09-28T15:11:00+5:30
३२ लाख ५० हजार रुपयाची फसगत झाल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
अलिबाग : आपला मुलगा, मुलगी डॉक्टर व्हावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने खाजगी पेक्षा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालकांचे प्रयत्न असतात. महाविद्यालयात मेरिट नुसार यादी जाहीर केली जाते. काहीजणांचा नंबर लागला नाही तर पालक हे ओळखीने प्रवेश मिळतोय काय याचा प्रयत्न करतात आणि फसतात. अशीच फसगत कोल्हापूर येथील पालकांची झाली आहे. ३२ लाख ५० हजार रुपयाची फसगत झाल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अभिजित वणिरे रा. कोल्हापूर यांच्या मुलीला अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षाला प्रवेश घ्यायचा होता. याबाबत आरोपी पंकज मेहता, अनिल मंडल रा. पश्चिम बंगाल, नारायण खरमोडे यांनी फिर्यादी वणिरे यांच्याशी संपर्क करून तुमच्या मुलीला प्रवेश मिळवून देतो यासाठी काही रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. वणिरे यांनी मुलीचा प्रवेश होणार या आनंदात आरोपीवर विश्वास ठेवून २७ सप्टेंबर रोजी ३२ लाख ५० हजार रुपये अलिबाग येथील रवी किरण हॉटेल मध्ये देण्यात आली.
अभिजित वणिरे यांनी अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आल्यानंतर मुलीचा प्रवेश कन्फर्म झाला नसल्याचे कळले. आपण फसलो गेल्याचे कळल्यावर वणिरे यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन करून तक्रार दाखल केली. वणिरे यांच्या तक्रारीनुसार तीनही आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी संतोष दराडे हे पुढील तपास करीत आहे. गेल्यावर्षी एका महिला पालकालाही फसविण्याची घटना घडली होती.