दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक

By दीपक भातुसे | Published: June 12, 2023 11:52 AM2023-06-12T11:52:51+5:302023-06-12T11:53:34+5:30

सोसायटी सभासदांनी घेतले दुबार पीक कर्ज

Fraud of crores by taking interest rebate twice | दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक

दोनदा व्याज सवलत घेत कोट्यवधींची फसवणूक

googlenewsNext

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींच्या काही सभासदांनी मागील सहा ते सात वर्षात दुबार पीक कर्ज घेऊन शासनाची फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर यासंदर्भात चौकशी सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना सहकार विभागाकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत दिली जाते. सातारा जिल्हा बँकेच्या विकास सोसायट्यांचे सभासद असलेल्या काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या विकास सोसायटी आणि राष्ट्रीयीकृत बँक अशा दोन्हीकडून पीक कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे दिसून आले. कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड सोसायटीत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांनी सहकार उपनिबंधक आणि स्टेट बँकेकडे केली होती. त्यांनी ईडीकडेही याची तक्रार केली आहे.

ईडीने मागविला आयुक्तांकडून अहवाल

ईडीने याप्रकरणी सहकार आयुक्तांकडून अहवाल मागवला होता. सहकार आयुक्तांनी ईडीची नोटीस सातारा जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली. उपनिबंधकांनी अशी कोणतीही चौकशी केली नसल्याचे आणि गुन्हा दाखल केला नसल्याचे सहकार आयुक्तांना कळवले आहे.

तब्बल दोन हजार शेतकरी दोनदा लाभार्थी?

साताऱ्यातील आठ तालुक्यातील व्याज सवलत घेतलेल्या शेतकऱ्यांची पाच वर्षातील संख्या २ हजारच्या घरात आहे. मात्र दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. वाई येथील सहायक निबंधकांनी एका विकास सोसायटी प्रकरणात दिलेल्या अहवालानुसार २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत दुबार पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा आकडा ६१३ इतका आहे. या सभासदांनी विकास सोसायटी आणि राष्ट्रीयकृत बँक असे दोन्हीकडून कर्ज घेऊन दोनदा व्याज सवलत योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

जिल्हा बँकेचा संबंध नाही

ज्यांनी दुबार पीक कर्ज घेतले आहे त्यात बँकेचा काहीही संबंध नाही. व्याज परतावा पडताळणी बँक करत नाही. त्याची पडताळणी सहकार विभाग करत असते. मागील सलग १० वर्ष बँकेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बँकेचा नावलौकिक चांगला आहे हे ज्यांना बघवत नाही ते असे उद्योग करत आहेत.  -नितीन पाटील, अध्यक्ष, सातारा जिल्हा सहकारी बँक

Web Title: Fraud of crores by taking interest rebate twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.