"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:58 AM2023-12-13T11:58:17+5:302023-12-13T11:58:58+5:30
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका भामट्याने नोकरीच्या नावाखाली २० हून अधिक बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीने रेल्वे राज्यमंत्री असल्याचे भासवून ही फसवणूक केली आहे. पैसे घेतल्यानंतर आरोपीने प्रत्येकाला जॉईनिंगची तारीख सांगून नियुक्तीपत्रेही दिली. त्यावेळी नोकरीसाठी पीडित तरुणांनी संबंधित कार्यालय गाठले असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सर्व पीडितांनी बरेली पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २० हून अधिक तरुणांची फसवणूक केली आहे. रेल्वे राज्यमंत्री असल्याचे सांगून आरोपींनी प्रत्येकाकडून प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले. एवढेच नाही तर आरोपीने प्रत्येकाला जॉईनिंगची तारीख सांगणारे नियुक्तीपत्रही दिले आहे. हे नियुक्तीपत्र घेऊन तरुणांनी संबंधित कार्यालय गाठले असता त्यांना आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली. यानंतर या पीडित तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बरेली एडीजींच्या तक्रारीनंतर इज्जत नगर पोलिस ठाण्यात एकूण ११ फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बरेली येथील शिव स्टेट कॉलनीमध्ये राहणारे विनोद कुमार यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. एअरफोर्स स्टेशनजवळ विनोद कुमार यांचे दुकान आहे. २०१८ मध्ये विजेंदर पाठक नावाचा एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आला होता. रेल्वे भरती बोर्डाचे अध्यक्ष आणि रेल्वे राज्यमंत्र्यांचे विश्वासू असल्याचे विनोद कुमार यांनी त्या व्यक्तीने सांगितले होते. तसेच, मंत्रिपदाच्या कोट्यातून रेल्वेत नोकरी मिळू शकेल, असे आश्वासन दिले होते. आपला मुलगा मयंक आणि अन्य एका व्यक्तीच्या मुलाच्या नियुक्तीपत्रासह रेल्वेचा पासही दाखवला. तसेच, आता टीसीची अनेक पदे रिक्त असून ती भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही संबंधीत व्यक्तीने विनोद कुमार यांना सांगितले होते.
आरोपीने विनोद कुमार यांना फसवण्यासाठी मयंक आणि करण शर्मा यांच्याशीही ओळख करून दिली. त्यावेळी करणने स्वत: संसदीय रेल्वे कार्यात असल्याचे सांगत ओळखपत्रही विनोद कुमार यांना दाखवले. यानंतर अजय गुप्ता, निशा गुप्ता आणि शिवाजी सिंह फौजी यांच्याशी विनोद कुमार यांची चर्चा झाली. तेव्हा अजय आणि निशा यांनी स्वत:ला अधिकारी तर शिवाजी सिंह फौजी यांनी स्वत: रेल्वे राज्यमंत्री असल्याचे सांगितले होते. यानंतर विनोद कुमार यांनी आरोपींना नोकरीसाठी १५ लाख रुपये दिले.
विनोद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशिवाय आरोपींनी इतर २० हून अधिक लोकांची फसवणूक केली होती. काही दिवसांनी आरोपीने सर्वांना नियुक्तीपत्रे वगैरे देऊन नियोजित तारखेला नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. तेव्हा पीडितांनी सांगितले की, जेव्हा ते आपले नियुक्तीपत्र घेऊन संबंधित कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना हे पत्र बनावट असल्याचे समजले. यानंतर पीडितांनी एडीजींकडे तक्रार केली. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.