करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 07:37 PM2022-01-23T19:37:41+5:302022-01-23T19:37:41+5:30
भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल
करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोपाखाली जळगाव, गंजेवाडा, भडगावातील पवन बापुराव पाटील (वय 28) नामक भोंदू बाबा विरोधात येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कळवा येथील प्रियांका राणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पवन याने त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्याने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीची प्रतिमा काढून दाखविली. पुढे त्याने प्रियांका, तिचा भाऊ आणि आईला तुमच्यावर कोणीतरी करणी केल्याचे सांगितले. करणी काढण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगत त्याने प्रियंका आणि तीच्या आईच्या बँक खात्यातून 31 लाख 6 हजार 874 रूपये वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यात ऑनलाईनद्वारे ट्रान्सफर करवून घेतले. त्याचबरोबर 1 लाख 9 हजार रूपये किंमतीच्या भेटवस्तूही त्याने त्यांच्याकडून घेतल्या.
पवनने 32 लाख 15 हजार 874 रूपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियंका हीने तिच्या तक्रारीत केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत डोंबिवली पश्चिमेकडील न्यू आयरे रोडला तिच्या आईच्या घरात घडल्याकडे लक्ष वेधले आहे. दाखल झालेल्या तक्रारीवरून फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत, त्यांचे समूळ उच्चाटन अन्वये पवन विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.