जादा परतावा देण्याच्या अमिषाने दोन कोटी ९२ लाखांची फसवणूक; संचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 08:09 PM2022-06-07T20:09:26+5:302022-06-07T20:09:31+5:30
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई: पत्नी पाठोपाठ पतीचीही कोठडीत रवानगी
ठाणे: जादा परतावा देण्याच्या अमिषाने तब्बल ३७ गुंतवणूकदारांची दोन कोटी ९२ लाखांची फसवणूक करणाºया बंटी बबली पैकी श्रीकांत पालांडे यालाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. त्याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यातील आरोपी श्रद्धा आणि तिचे पती श्रीकांत यांनी त्यांच्या अनुजा कन्सल्टन्सीतर्फे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एक लाखांची गुंतवणूकीवर महिना पाच टक्के परतावा मिळेल, अशा आकर्षक तसेच अशक्यप्राय योजनांचे अमिष गुंतवणूकदारांना दाखविले. याच अमिषाला बळी पडून ठाणे, मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बैगलोर येथील अनेक गुंतवणूकदारांनी अनुजा कन्सल्टन्सी या कंपनीच्या नावाने असलेल्या बँक खात्यात तसेच त्यांच्या वैयक्तिक खात्यावर पैसे जमा केले. या दाम्पत्याने गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारुन मुदतीनंतर मात्र त्यांना कोणताही परतावा अथवा मुळ मुद्दल रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२१ मध्ये फसवणूकीसह महाराष्टÑ ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये अशा ३७ गुंतवणूकदारांकडून दोन कोटी ९२ लाखांची रक्कम या दाम्पत्याने उकळल्याचे समोर आले. श्रद्धा पालांडे हिला ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पन्हाळे यांच्या पथकाने यापूर्वीच २४ मे २०२२ रोजी अटक केली आहे.
सुरुवातीला याप्रकरणी चार जणांची ६९ लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. ही व्याप्ती मोठी असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. श्रीकांत पालांडे फरार झाला होता. अखेर त्याचाही शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. त्याला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये आणखीही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.