फायनान्स कंपनीत सात लाखांची अफरातफर, दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By चुडामण.बोरसे | Published: July 15, 2023 07:02 PM2023-07-15T19:02:37+5:302023-07-15T19:04:56+5:30
अरुण रोहिदास चव्हाण (२८) आणि विशाल सुनील खिल्लारे (३०) अशी दोघांची नावे
जामनेर (जि. जळगाव) : खासगी फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या दोघांनी कर्जदारांकडून घेतलेली हप्त्याची रक्कम जमा न करता सात लाखांची अफरातफर केली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण रोहिदास चव्हाण (२८, नांद्रा तांडा, ता. सोयगाव) आणि विशाल सुनील खिल्लारे (३०, वरवट, ता. बुलढाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शाखाधिकारी निखील माहोर (वाकी खुर्द, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कंपनीतील फिल्ड असिस्टंट चव्हाण व खिल्लारे यांनी कर्ज हप्त्याची जमा केलेली रक्कम अनुक्रमे दोन लाख वीस हजार रुपये व चार लाख ८३ हजार रुपयांची रक्कम कंपनी शाखेत रोखपालाकडे जमा केली नाही. दोघेही सध्या काम सोडून निघून गेले. याबाबत वरील दोघांविरुद्ध जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश अहिरे तपास करीत आहेत.