बँक खाते बंद होणार असल्याची बतावणी करून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 01:55 AM2019-11-29T01:55:06+5:302019-11-29T01:55:30+5:30
तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियामधील बँक खाते बंद करण्यात येणार असल्याची बतावणी करून एका भामट्याने ठाण्यातील नितीन वीरकर (५८) यांचे चार लाख ३५ हजार ९८० रुपये आॅनलाइन लुबाडले.
ठाणे : तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडियामधील बँक खाते बंद करण्यात येणार असल्याची बतावणी करून एका भामट्याने ठाण्यातील नितीन वीरकर (५८) यांचे चार लाख ३५ हजार ९८० रुपये आॅनलाइन लुबाडले. हा प्रकार बुधवारी सकाळी पाचपाखाडी येथे घडला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाचपाखाडीमध्ये राहणाऱ्या वीरकर यांच्या मोबाइल क्रमांकावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका भामट्याने एक एसएमएस पाठवून त्यामध्ये एक लिंक पाठविली. मजकुरामध्ये ‘तुमची जन्मतारीख चुकीची असल्यामुळे तुमचे एसबीआयचे खाते आजपासून बंद करण्यात येत आहे’, असा उल्लेख करण्यात आला.
या एसएमएसमधील मोबाइल क्रमांकावर वीरकर यांनी संपर्क साधला. तेव्हा समोरील व्यक्तीने संतोष श्रीवास्तव असे नाव सांगितले. त्यानंतर त्याने एसबीआय आणि ग्रेटर बँकेच्या बचत खात्याची संपूर्ण माहिती आॅनलाइन आयडी आणि पासवर्डही मागितले.
ही संपूर्ण माहिती वीरकर यांनी दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून चार लाख ३५ हजार ९८० रुपये आयडीएफसी बँकेत वळते करण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष बँकेत चौकशी केल्यानंतर श्रीवास्तव नाव सांगणाºयाने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले.
याप्रकरणी वीरकर यांनी अखेर २७ नोव्हेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.