अल्प दरामध्ये हज येथे जाण्याचे प्रलोभन दाखवून यात्रेकरुंची दोन कोटी ७० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 10:05 PM2021-10-08T22:05:49+5:302021-10-08T22:06:32+5:30
Crime News : कंपनीच्या मुख्य संचालकास अटक
ठाणे: अल्प दरामध्ये हज येथे जाण्याचे प्रलोभन दाखवून यात्रेकरुंची तसेच जादा परतावा देण्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची दोन कोटी ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या सुहाना फैश प्रायव्हेट लिमिटेड आणि हलाल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक नासिर शेख (४६, रा. कोपरखैरणो, नवी मुंबई) याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
कल्याण येथील रहिवाशी जावेद अहमद शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम तीन नुसार याप्रकरणी २३ जून २०२१ रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. कथित आरोपी नासिर याने ‘अल हरम इंटरनॅशनल टुर्स अॅण्ड टॅव्हर्ल्स’ या कंपनीमार्फत हज व उमरा येथे स्वस्त दरात पाठविण्याचे आमिष अनेकांना दाखविले. प्रत्यक्षात तिथे न पाठविता ‘सुहाना फैश प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘हलाल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये जादा परताव्याचे प्रलोभन दाखविले. त्याद्वारे यातील तक्रारदार शेख यांच्यासह इतर गुंतवणूकदारांना या कंपन्यांमध्ये
गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. प्रत्यक्ष मुदतीनंतर मात्र मुद्दल आणि त्यावरील परतावा देण्यास टाळाटाळ केली. अशा प्रकारे त्याने अनेकांचा विश्वासघात करुन शेखसह यात्रेकरु तसेच गुंतवणूकदारांची दोन कोटी ७० लाख नऊ हजार ४७० रुपयांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यापासून शेख पसार झाला होता. मात्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी त्याला कल्याण येथून अटक करण्यात आली.