एमबीएच्या प्रवेशाच्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 02:08 PM2020-09-06T14:08:20+5:302020-09-06T14:08:34+5:30
सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती तसेच तात्पुरते प्रवेश पत्र पाठविले़ त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली़
पुणे : संचालकांशी थेट संबंध असल्याची बतावणी करुन एमबीएला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी चौघा जणांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अंबर अनीष चॅटर्जी, अयान अनीष चॅटर्जी, आरती अनीष चॅटर्जी अशी गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत.
याप्रकरणी हडपसरमधील एका २१ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील एमआयटी कॉलेजच्या आवारात डिसेंबर २०१९ ते १२ आॅगस्ट २०२० दरम्यान घडला़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी अंबर चॅटर्जी हे वर्गमित्र आहेत़ ते एमआयटीमध्ये बीबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहेत़ अंबर त्याचा भाऊ अयान चॅटर्जी याने फिर्यादीला लवळे येथील सिम्बॉयोसिस कॉलेजच्या प्रमुखांसोबत थेट संपर्क असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला़ त्यानंतर इतर आरोपींच्या मदतीने मॅनेजमेंट कोट्यातून एमबीएला प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन दिले़ फिर्यादीला ई मेल आयडी तसेच लिंकवरुन सिम्बॉयोसिस
कॉलेजच्या नावे खोटे व बनावट मेल पाठवून एम बी ए अॅडमिशन केले आहे, असे भासविले़ त्या बदल्यात स्वत:चे अकाऊंटवर रोख रक्कम स्वीकारली.
सिम्बॉयोसिस कॉलेजच्या नावे फी स्वीकृतीची बनावट पावती तसेच तात्पुरते प्रवेश पत्र पाठविले़ त्यासाठी त्यांनी फिर्यादीकडून ६५ लाख ६९ हजार ४०० रुपये घेऊन फसवणूक केली़ आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी याने पैसे परत मागितल्यावर त्यांना शिवीगाळ करुन धमकावले़ कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.