पैसे गुंतवणुकीवर भरगच्च व्याजाचे आमिष दाखवून आठ कोटींची फसवणूक; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:10 AM2021-10-06T10:10:09+5:302021-10-06T10:13:52+5:30
या कंपनीने वसई विरार परिसरातील नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के, असे भरगोस व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.
वसईतील शेकडो लोकांचे पैसे इतरत्र गुंतवणूक करून आठ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे. अमित कांतीलाल जैन आणि योगेश भालेराव, अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यांनी वसईत मे. एज इडू प्लस कन्सल्टन्सी प्रा. लि. (Aaj Edu Plus Consultancy Pvt Ltd. ) नावाने कंपनी सुरू केली होती.
या कंपनीने वसई विरार परिसरातील नागरिकांना त्यांच्या गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के, असे भरगोस व्याज देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपींनी वसई परिसरातील तब्बल २१५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ८ कोटी ७१ लाखांची रक्कम उकळली आणि त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून आरोपी दुबई येथे पळून गेले होते.
पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत असतानाच आरोपी अमित जैन हा वसईच्या चिंचोटी परिसरात आला होता तर दुसरा आरोपी योगेश भालेराव हा गुजरात येथे आल्याचे समजताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या आरोपींनी ग्राहकांकडून पैसे लुबाडून चिंचोटी येथे रो-हाऊस, तथा बंगलो व पुणे येथील रेल्वे स्टेशन जवळ जमिन खरेदी केली होती. पोलिसांनी या सर्व जागादेखील जप्त केल्या आहेत. अधिक तपास केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पदमजा बडे यांनी दिली आहे.