श्यामराव विठ्ठल सहकारी बँकेची बडतर्फ कर्मचाऱ्यांकडून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:52 PM2019-12-20T23:52:47+5:302019-12-20T23:53:44+5:30
श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, संगणक प्रणालीत केला फेरफार
ठाणे - एसव्हीसी अर्थात श्यामराव विठ्ठल सहकारी बँकेचे बडतर्फ कर्मचारी शक्तील कुबल आणि पराग शिंदे यांनी आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने बँकेच्या संगणक प्रणालीमध्ये अनधिकृतरित्या शिरकाव करून बँकेची सुमारे २९ कोटींची फसवणूक तसेच नुकसान केल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. याप्रकरणी एसव्हीसी को- ऑपरेटिव्ह बँक प्रशासनाने श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका तपास पथकाची नियुक्ती केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
यासंदर्भात एसव्हीसी सहकारी बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार १ एप्रिल २०१९ ते २४ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये या बँकेच्या ४४७ बँक खातेधारक आणि कर्मचारी यांच्या खात्यामध्ये बँकेचे बडतर्फ कर्मचारी शक्तील कुबल, पराग शिंदे आणि निलंबित कर्मचारी राहुल साटम यांनी अनधिकृतरीत्या प्रवेश केला.
बँकेच्या खातेधारकांची आणि कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती पीडीएफ करून पराग शिंदे आणि राहुल साटम यांच्याकडे बँकेने बँकेच्या खातेधारकांची आर्थिक गोपनीय माहिती वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनॅकल इमारतीमधील सर्व्हरमध्ये विश्वासाने दिलेली होती. तरीही, त्यांनी त्यांच्या पदाच्या निगडित कामकाजाचा भाग नसतानाही कुबल यांनी दिलेल्या चिथावणी आणि प्रलोभनावरून बँकेची गोपनीय माहिती चोरली.
या माहितीचा गैरवापर करून त्याद्वारे बँकेची बदनामी करून खातेधारकांच्या मनात बँकेविषयी अविश्वासाची भावना निर्माण केली. त्यातूनच बँकेच्या संगणक प्रणालीमध्ये अनधिकृतरीत्या बेकायदेशीरपणे प्रवेश मिळवून इंटरनेटच्या माध्यमातून बँकेच्या खातेधारकांची आर्थिक गोपनीय माहिती आधी स्वत:च्या वैयक्तिक मेलवर पाठवून नंतर ती कुबल याच्याकडे फॉरवर्ड केली. त्याने या माहितीचा हेतुपुरस्सर गैरवापर करून बँकेची बदनामी केल्याने बँकेच्या खातेधारकांनी त्यांच्या ठेवी मुदतपूर्व काढून घेतल्या.
त्यातून बँकेच्या २९ कोटींच्या नुकसानीला कुबल, शिंदे आणि निलंबित कर्मचारी साटम हे कारणीभूत ठरले. ही बाब बँक प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बँकेने याप्रकरणी या तिघांविरुद्ध फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
बँक व्यवस्थापनाने हा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी एका पथकाची निर्मिती केली आहे. यातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.
- विजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनगर पोलीस ठाणे
बँकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. तसेच बँकेचा सर्व डाटा पूर्णत: सुरक्षित असून ग्राहकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. गैरव्यवहार करणाऱ्यशक्तील कुबल आणि पराग शिंदे यांच्यावर बडतर्फीची, तर राहुल साटम याच्यावर निलंबनाची कारवाई केली असून ग्राहकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. - एसव्हीसी बँक व्यवस्थापन, ठाणे