अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 06:30 AM2021-03-02T06:30:17+5:302021-03-02T06:30:20+5:30
भाईंदर येथील रहिवासी डेनिस हे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास बोरीवली येथील संजय गांधी राष्टीय उद्यानाच्या उड्डाणपुलाजवळील परिवहन विभागाच्या कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी रोहित नामक भामटा त्यांच्याकडे आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भारतीय नोटा देण्याच्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देण्याची बतावणी करून डेनिस पाटील (४३, रा. भाईंदर) यांची तीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे.
भाईंदर येथील रहिवासी डेनिस हे २४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास बोरीवली येथील संजय गांधी राष्टीय उद्यानाच्या उड्डाणपुलाजवळील परिवहन विभागाच्या कार्यालयात काम करीत होते. त्यावेळी रोहित नामक भामटा त्यांच्याकडे आला. त्याने डेनिस यांना अमेरिकन डॉलर दाखवून सुट्या पैशांची मागणी केली. हे भारतीय चलन नसून त्याबाबत कारवाई होऊ शकते, असाही दावा केला. त्याचवेळी असे बरेच डॉलर आपल्या मित्राकडे असल्याचेही रोहितने त्यांना सांगितले. त्यानंतर २७ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अभ्युदय को-ऑप. हौसिंग सोसायटी येथील राऊत शाळेच्या समोरील गल्लीमध्ये चेंदणी कोळीवाडा, कोपरी भागात रोहित आणि त्याच्या साथीदाराने आपसात संगनमत करून ठरल्याप्रमाणे डेनिस यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड घेतली.
त्या बदल्यामध्ये एक हजार ४४० इतके अमेरिकन डॉलर देत असल्याची बतावणी करून एक गडद निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवलेले आणि चॉकलेटी रुमालामध्ये बांधलेले चलनाच्या आकाराचे इंग्रजी न्यूज पेपरचे कात्रण हे अमेरिकन डॉलर असल्याचे भासवून ते त्यांना देऊन तिथून पलायन केले.