आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन फसविणाऱ्या टोळीचा सुत्रधार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 07:07 PM2018-08-02T19:07:50+5:302018-08-02T19:09:11+5:30
आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयाला फसवणुक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास गंगाखेड पोलीसांनी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथून ताब्यात घेतले.
गंगाखेड (परभणी) : आरोग्य खात्यात नौकरीस लावतो म्हणुन सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयाला फसवणुक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास गंगाखेड पोलीसांनी मुंबईतील सीबीडी बेलापुर येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
तालुक्यातील ढवळकेवाडी येथील सुरेश बाबुराव राठोड व किरण धेनु राठोड या दोन सुशिक्षित बेरोजगार तरूणांना आरोग्य खात्यात कनिष्ठ लिपिक पदावर नौकरीला लावतो म्हणुन प्रत्येकी साडे आठ लाख रुपये प्रमाणे सतरा लाख रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी दि. २३ जुन रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात पोलीसांनी यापुर्वी चार आरोपींना अटक करून त्यांच्या कडुन मराठवाड्यातील पंचावन्न सुशिक्षित बेरोजगार तरुण, तरुणींच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र जप्त केले आहे.
या गुन्ह्यातील टोळीचा सुत्रधार हा नवी मुंबईतील डॉ. जितेंद्र बंडू भोसले हा असल्याचे तपासातून समोर आले. यानंतर पोउपनि रवि मुंडे, पोना. साहेब मानेबोईनवाड, पोशि. गणेश वाघ, सुनिल लोखंडे, सुग्रीव कांदे यांच्या पथकाने ३१ जुलै रोजी नवी मुंबई येथील सीबीडी बेलापुर परीसरातून भोसलेला ताब्यात घेतले. आरोपींनी संपूर्ण राज्यात बेरोजगारांची फसवणूक केली आहे.