'नो ब्रोकर'मार्फत घर शोधताना फसवणूक; दोघांवर अंबोली पोलिसात गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: February 8, 2024 04:22 PM2024-02-08T16:22:01+5:302024-02-08T16:22:58+5:30
तक्रारदार राघव सोनी हे अंधेरी पश्चिमच्या पेनिसुला पार्क याठिकाणी नोकरी करतात.
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नो ब्रोकर ॲपमार्फत भाडेतत्त्वावर घर शोधताना एका व्यक्तीला आर्थिक फटका बसला. याप्रकरणी त्यांनी अंबोली पोलिसात तक्रार दिल्यावर दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार राघव सोनी हे अंधेरी पश्चिमच्या पेनिसुला पार्क याठिकाणी नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ते स्वतःसाठी भाडेतत्त्वावर एक घर शोधत होते. यासाठी त्यांनी नो ब्रोकर ॲपची मदत घेण्याचे ठरवले. त्यावर ते घर पाहत असताना अंधेरी पश्चिम परिसरात असलेले वन बीएचके त्यांना आवडले. त्यामुळे त्यांनी त्यावर नमूद असलेल्या संबंधित क्रमांकावर संपर्क केला. तेव्हा त्या रूमचे मालक प्रशांत बनकर आणि सोसायटी मॅनेजर महेश अग्रवाल अशी नावे सांगत आरोपींनी त्यांना ७० हजार १९८ रुपयांचा चुना लावला. हे पैसे वेगवेगळी कारणे देत त्यांना पाठवायला सांगण्यात आले मात्र त्यांना घर मिळाले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनी यांनी या विरोधात अंबोली पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४,४२० तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६(सी) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.