बनावट लग्न करून तरुणांची फसवणूक, विवाह लावून मागितली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:28 AM2021-03-15T07:28:28+5:302021-03-15T07:29:04+5:30
प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे.
आष्टी (जि. बीड) : तरुणांसोबत बनावट विवाह करून चार-आठ दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत ९ मार्च रोजी विवाह करून दोन लाख रुपये न दिल्यास फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत खंडणी वसूल करताना पोलिसांनी दोघांना पकडले, तर आणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत यातील महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज आहे.
सोनाली गणेश काळे (२९, रा. लातूर) व अजय महारुद्र चवळे (२७, रा. खंडापूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना पाटोदा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर याप्रकरणी आणखी एक आरोपी रामा काशीनाथ बडे (रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिराळ येथील एका युवकाने आष्टी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी या तक्रारीची खात्री करण्यासाठी दोन शासकीय पंचांसह सापळा रचला. एक महिला व पुरुषाने मागणी केल्याप्रमाणे तक्रारदार युवकाकडून रोख रक्कम ५० हजार रुपये शासकीय पंचांसमक्ष स्वीकारत असताना पकडण्यात आले.
आमिषाला बळी पडू नये
वय जास्त झालेल्या तरुणांना संपर्क करून लग्नाचे आमिष दाखवून या टोळीकडून आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगून स्थळ दाखवले जाते व लग्नासाठी पैशांची मागणी करून वारंवार खंडणी वसूल केली जाते. अशा टोळ्यांपासून तरुणांनी सावध राहावे, अशी फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.
- सलीम चाऊस, पोलीस निरीक्षक, आष्टी