महाठग अजित पारसेकडून CBIचे बनावट लेटर, ५० कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न
By नरेश डोंगरे | Published: November 8, 2022 08:15 PM2022-11-08T20:15:55+5:302022-11-08T20:16:36+5:30
शेकडो जणांची फसवणूक, पण पोलीस म्हणतात- तक्रारदार आमच्याकडे येतच नाहीत!
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महाठग अजित पारसेच्या विरोधात कोट्यवधीच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल होऊन आता २८ दिवस झाले. मात्र, पोलिसांकडून त्याला अद्याप अटक झालेली नाही. तो अनफिट असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद आहे. अजितच्या कथित 'अनफिटनेस'ची दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलकडून चाैकशी का होत नाही, तेसुद्धा कळायला मार्ग नाही. दरम्यान, शंभरावर जणांना दोनशेवर कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालणाऱ्या अजित पारसेचा आता चक्क ५० कोटींच्या फसवणूकीचा किस्सा चर्चेला आला आहे.
आपल्या ईमेज बिल्डिंग टीमच्या माध्यमातून सतत प्रकाशझोतात राहणारा महाठग पारसे याने विविध क्षेत्रातील मंडळींना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले. हे करण्यासाठी त्याने थेट पंतप्रधान कार्यालयाच्या बनावट पत्राचाही वापर केला. हे करतानाच त्याच्या जाळ्यात आलेल्या अनेक लब्धप्रतिष्ठितांनाही त्याने सीबीआय, ईडीच्या कार्यालयाचा धाक दाखवून त्यांच्याकडून कारवाई टाळण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये घेतले.
अशाच प्रकारचा एक नवा किस्सा आता संबंधित वर्तुळात चर्चेला आला आहे. त्यानुसार, संशोधनाचे कार्य करणाऱ्या काही जणांवर महाठग पारसेने काही महिन्यांपूर्वी जाळे टाकले. सीबीआयकडून तुमची आणि संस्थेच्या कारभाराची चाैकशी तसेच संस्थेने मिळवलेल्या निधीचीही चाैकशी होणार असल्याची थाप मारली. ही थाप खरी वाटावी म्हणून त्याने फोटोशॉपच्या माध्यमातून तयार केलेेले सीबीआयचे एक बनावट लेटर संबंधितांना दाखवले. तुमचा किमान दीड-दोनशे कोटींचा घोळ लपविण्यासाठी चाैकशीच होऊ नये, असा प्रयत्न करावा लागेल, असेही सूचविले. त्याच्याकडून दाखविण्यात आलेल्या कथित लेटर बॉम्बमुळे पुरते थंडगार झालेल्या संबंधितांनी त्यालाच मार्ग काढण्याची विनंती केली.
स्वत:च दाखवली मांडवलीची तयारी- सावज जाळ्यात अडकल्याचे लक्षात आल्याने महाठग पारसेने दिल्लीच्या नावाखाली भलत्याच कुणाशी बोलून ५० कोटी द्यावे लागतील, असा प्रस्ताव ठेवला. ही रोकड देऊन चाैकशीचा आणि कारवाईचा ससेमिरा टाळता येईल. त्यासाठी आपण मांडवलीकार (मध्यस्थ) म्हणून भूमिका वठविण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले.
झाप झाप झापले अन्... - पारसेने मागितलेली रोकड फारच मोठी असल्याने प्रकरण एका शिर्षस्थांकडे गेले. त्यांनी पारसेला विचारणा केली नंतर दिल्लीत शहानिशा झाली आणि महाठग पारसेची बनवाबनवी उघड झाली. त्यामुळे शिर्षस्थांकडून पारसेला झाप झाप झापण्यात आले, यापुढे दारात पाय ठेवायचा नाही आणि आमचे कुठे नाव वापरायचे नाही, अशी तंबीही शिर्षस्थांनी महाठग पारसेला दिली होती, अशी चर्चा आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?- छोट्या-मोठ्या फसणूकीच्या प्रकरणात अत्यंत आक्रमकपणे कारवाई करणारे शहर पोलीस महाठग पारसेविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर शहरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने पोलिसांची भूमीकाच संशयास्पद ठरली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारले असता 'पारसे अनफिट आहे, त्यामुळे त्याला अटक करता येणार नसल्याचे अधिकारी म्हणतात. 'पारसेच्या अनफिटनेसची शहानिशा का होत नाही, त्यावर मात्र ठोस उत्तर मिळत नाही.