खासदार अमोल कोल्हे यांच्या पी.ए.च्या नावाने फसवणूक करणारा जेरबंद
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: June 5, 2023 08:12 PM2023-06-05T20:12:42+5:302023-06-05T20:13:09+5:30
रविकांत मधुकर फसाळे असं आरोपीचे नाव
मनोज शेलार, नंदुरबार: खासदार अमोल कोल्हे यांचा पी.ए.च्या नावाने पोलिसांची फसवणूक करणाऱ्या युवकाला नंदुरबार एलसीबीने अटक केली. रविकांत मधुकर फसाळे (३२) रा. मोरंडे, पोस्ट मोरचंडी, ता. मोखाडा, जिल्हा पालघर असे संशयिताचे नाव आहे.
१ जून रोजी रात्री पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर खासदार अमोल कोल्हे यांचा पी.ए. असल्याचे सांगून शहाद्यात अपघात झाला असून, त्यांना मदत करण्याचा संदर्भात मेसेज आला. पाटील यांनी जनसंपर्क अधिकारी उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांना मदत करण्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी आपण प्रबोधचंद्र सावंत बोलत असून खासदार अमोल कोल्हे यांचे पी.ए. असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला असता फसाळे नामक व्यक्तीने अपघातातील जखमींना घेऊन जाण्यासाठी असलेल्या रुग्णवाहिकेला लागणारे डिझेल व जेवणासाठी पैशांची मागणी केली. मोहिते यांनी एक हजार रुपये त्यासाठी फोन पेद्वारे पाठविले. मोहिते यांनी सकाळी अपघाताची माहिती घेतली असता जिल्ह्यात असा कुठलाही अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर संशयित रविकांत मधुकर फसाळे याच्याविरुद्ध नंदुरबार पोलिसात फसवणूक व सायबर क्राइमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबीने तपासासाठी नाशिक व पालघर जिल्ह्यात पथक रवाना केले. तांत्रिक मदतीच्या आधारे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या मोरचंडी गावात जाऊन शोध घेतला. फसाळे हा त्र्यंबक, जि. नाशिक येथे गेल्याचे समजल्यावर तेथून त्याला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी यांचे मोबाईल नंबर आढळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहायक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार महेंद्र नगराळे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, शोएब शेख यांच्या पथकाने केली.