ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 05:10 PM2019-09-06T17:10:27+5:302019-09-06T17:14:06+5:30
या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई - ऑस्ट्रेलियात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली साकीनाका येथील ३२ वर्षीय तरुणाची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
साकीनाका येथील रहिवासी असलेले शोभित जवाहरलाल राजदान (३२) यांची यात फसवणूक झाली आहे. ते ब्लीस जी.व्ही.एस. फार्मा लिमिटेड कंपनीत नोकरी करतात. २ ऑगस्ट रोजी त्यांनी मोबाइलवर ऑस्ट्रेलियातील नोकरीबाबत वाचले. त्यात, व्हिसा आणि अन्य कामाकरिता मदतही मिळेल, असे नमूद करण्यात आले होते. एंड्रीया क्रिस्टेन नावाच्या माणसाने ती जाहिरात पाठविली होती. राजदान यांनी एड्रियासोबत संपर्क साधला. तेव्हा, एड्रियाने तो २ सप्टेंबरला दिल्लीला येणार असून, ३ सप्टेंबरला मुंबईला येणार असल्याचे सांगितले.
एंड्रियाच्या सांगण्यानुसार, राजदान यांनी कागदपत्रेही तयार केली. याच दरम्यान २ सप्टेंबर रोजी त्याला एंड्रियाने कॉल करून तो दिल्लीला आला असून, कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अडविल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला ७५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानेही विश्वास ठेवून पैसे पाठविले. पुढे, एंड्रीयाने आणखी १० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, ऑनलाइन पैसे पाठविण्याची मर्यादा ७५ हजार रुपये असल्याने आणखी पैसे पाठविणे शक्य नसल्याचे सांगितले. पैसे मिळत नाहीत तोपर्यंत कस्टम अधिकारी तेथेच एका रूममध्ये ठेवणार असल्याचे एंड्रियाने सांगितले. ३ सप्टेबरला एंड्रियाने आणखी १ लाख ४२ हजार रुपये भरावे लागतील असे सांगितले. कस्टम अधिकारी म्हणून नेहा श्रीवास्तव नावाच्या महिलेने राजदानला लवकरात लवकर पैसे पाठविण्यास सांगितले. त्याला संशय आल्याने त्याने दिल्ली कस्टम विभागात संपर्क साधून नेहा श्रीवास्तवबाबत चौकशी केली.