किरण गोसावीविरोधात दोषारोपपत्र; नोकरीचे आमिष दाखवून केली होती फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:35 AM2022-02-16T06:35:23+5:302022-02-16T06:35:39+5:30
पुण्यातील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे होते दाखल
पुणे : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज पार्टीतील एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पुण्यातील चिन्मय देशमुख याला २०१८ मध्ये मलेशियात नोकरीचे आमिष दाखवून गोसावीने ३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गोसावीवर काहीही कारवाई केली नव्हती. आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याबरोबरचा फोटो किरण गोसावी याने व्हॉट्सॲपवर टाकला होता. त्यावरून पुण्यातील गुन्ह्यात हा पंच वाँटेड असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी शोध घेऊन ऑक्टोबरमध्ये त्याला अटक केली होती. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गोसावी व त्याच्या साथीदारांवर ३५० पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्याचप्रमाणे लष्कर पोलिसांनीही ५० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
नोकरीचे आमिष
गोसावीने ज्या महिलेच्या बँक खात्यावर हे पैसे घेतले, तिलाही पोलिसांनी अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर पुण्यात अशाच प्रकारे फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले होते.