भिवंडीत दोन भावांची वेठबिगारीतून केली मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:13 AM2020-07-30T00:13:22+5:302020-07-30T00:24:56+5:30

मालकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा : श्रमजीवी संघटनेचा पुढाकार

Freed two brothers from captivity in Bhiwandi | भिवंडीत दोन भावांची वेठबिगारीतून केली मुक्तता

भिवंडीत दोन भावांची वेठबिगारीतून केली मुक्तता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : तालुक्यातील पाये, नाईकपाडा येथे राहणाऱ्या राजेश भोईर (२४) व भीमा भोईर (२२) या दोन भावांची श्रमजीवी संघटनेने वेठबिगारीतून मुक्तता केली आहे. खार्डी गावातील निलेश तांगडी याने सर्व्हिस सेंटर व शेतीच्या कामावर दोन वर्षांपासून अहोरात्र राबवून त्यांची शारीरिक व आर्थिक पिळवणूक केली. या अन्यायाविरोधात पीडित तरुणांनी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून तालुका पोलीस ठाण्यात निलेशविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
निलेश याने पीडित तरुणांच्या लग्नासासठी एक लाख १९ हजार ६९० रुपये खर्च केला होता. त्याबाबत त्याने लिहून दिले होते. लग्नानंतर काही दिवसांनी दोघांनीही निलेशच्या कैलास सर्व्हिस सेंटर येथे कामावर जाण्यास सुरुवात केली. प्रत्येकी तीन हजार ५०० रुपये महिना वेतन निश्चित केले. दोघांना दुचाकी गाडी घेऊन दिली होती. त्याचे हप्ते पगारातून कापले जायचे. सर्व्हिस सेंटरवर काम नसले की, निलेश त्यांच्याकडून शेती किंवा अन्य कामे करून घ्यायचा. कोरोनामुळे काम बंद असल्याने दोघे भाऊ हे घरातील आवणीचे काम करत होते. त्याने दोघा भावांना फोनवरून आवणीच्या कामाला चला, असा तगादा लावला. घरच्या शेतीचे काम आटोपून कामावर येतो, असे सांगितले. मात्र, निलेश ऐकत नव्हता. त्यामुळे या दोघांनी हिशेब करण्यास सांगितले. याचा राग मनात ठेवून निलेश याने दोघांना मारण्याची धमकी दिली. व्याजासह तीन लाख रुपये एका महिन्यात परत द्या, असे धमकावले. या कुटुंबाने श्रमजीवी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस बाळाराम भोईर यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांची मदत घेऊन सोमवारी रात्री उशिरा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला.
तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना हा प्रकार समजल्यावर यांनी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांसह पीडित राजेश व भीमा या दोघांना कार्यालयात बोलावून त्यांना वेठबिगारमुक्तीचे दाखले देऊन मुक्त केले.
भिवंडी शहराध्यक्ष सागर देसक, सचिव मोतीराम नामकुडा, भोईर, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, ठाणे जिल्हा शेतकरी घटकप्रमुख संगीता भोमटे, ठाणे जिल्हा महिला घटकप्रमुख जया पारधी यावेळी उपस्थित होते.\
सुनील लोणे, केशव पारधी, गुरुनाथ वाघे, महेंद्र निरगुडा, किशोर हुमणे यांनीही पीडितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. याप्रकरणी अधिक तपास गणेशपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले करीत आहेत.

Web Title: Freed two brothers from captivity in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.