फ्रेंच विद्यार्थिनीसोबत दिल्लीत छेडछाड; पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:35 PM2018-10-29T13:35:34+5:302018-10-29T13:50:02+5:30
याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
नवी दिल्ली - स्टुडंट एक्सचेंज कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका फ्रान्सच्या विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थिनी ज्या भारतीय विद्यार्थ्याच्या घरी राहण्यास आली होती. त्या भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांनी परदेशी म्हणजेच फ्रेंच विद्यार्थिनीसोबत छेडछाड केल्याचा आरोप या पीडित विद्यार्थिनीने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात दिल्लीतील नेब सराई पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित विद्यार्थिनीने सर्वप्रथम या घटनेबद्दल आपल्या फ्रान्समधील शिक्षकांना आणि मित्रांना माहिती दिली. त्यानंतर पीडितेच्या घरातल्यांना याबद्दल कळवण्यात आले. त्यानंतर शिक्षकांनी झालेल्या प्रकाराची माहिती भारतातील फ्रान्सच्या दूतावासाला दिली. नंतर पीडित तरुणीला दुसऱ्या एका भारतीय कुटुंबाकडे पाठवण्यात आले. आरोपी घर खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून या घटनेनंतर त्याने पळ काढला. ही घटना १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून २३ ऑक्टोबरला नेब सराई पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा. दं. वि. कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्यातील कलम ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीचा मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर सीआरपीसी १६४ अंतर्गत जबाब नोंद करून घेण्यात आला आहे.