मित्रांना रडू आवरले नाही; जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 04:51 PM2021-07-26T16:51:07+5:302021-07-26T16:52:16+5:30
Police Death : मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही.
नालासोपारा : शांत, सदैव हसरा आणि मनमिळावू ३४ वर्षीय पोलीस अंमलदाराचा रविवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाल्याने पोलिसांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्र मस्के (३४) असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून नालासोपारा पोलीस ठाण्यात नेमणूक होती.
महेंद्र मस्के हे वसई न्यायालयात काम करत होते. रविवारी रात्री पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कोर्ट कारकून, शिपाई मित्रांसोबत कामण येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी संस्कृती हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी झटपट तपासण्या करून ऑक्सिजन लावला, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री त्याचा मृतदेह रिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये मृतदेह पाठवून जळगाव येथील मूळ गावी त्यांचे अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी असा परिवार आहे. मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही.